गेल्या एक महिन्यापासून इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास, यांच्यात युद्ध सुरू आहे. दरम्यान, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) सध्या इस्रायलमध्ये आहेत. इस्रायल आणि हमास युद्धादरम्यान ते सोमवारी इस्रायलला पोहोचले. यादरम्यान त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग यांची भेट घेतली.
इलॉन मस्क यांनी गाझा पट्टीजवळील किबुत्झ शहराला भेट दिली. हमासने ऑक्टोबर २०१५ मध्ये किबुत्झवरच हल्ला केला, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, इलॉन मस्क यांच्या भेटीबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, हमासच्या सैनिकांनी किबुत्झमध्ये केलेल्या हत्याकांडाची भीषणता त्यांनी इलॉन मस्क यांना दाखवली. यावेळी आम्ही किबुत्झमधील पीडितांच्या घरांनाही भेट दिली.
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इलॉन मस्क यांना हमासच्या सैनिकांनी निर्दयीपणे मारलेल्या इस्रायली नागरिकांची घरेही दाखवली. त्यापैकी चार वर्षांची इस्रायली-अमेरिकन मुलगी अभिगेल इदान आहे, जिच्या आई-वडिलांना दहशतवाद्यांनी मारले होते. इदानला हमासने रविवारी सोडले. दरम्यान, नेतन्याहू यांनी या घटनेचे काही फोटोही शेअर केले आहेत. तसेच, यादरम्यान नेतन्याहू यांनी इलॉन मस्क यांना आयडीएफने तयार केलेली फिल्मही दाखवली. या फिल्ममध्ये ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्याची संपूर्ण भीषणता दाखवण्यात आली आहे.
यादरम्यान, एक्सवर नेतन्याहू यांच्याशी लाईव्ह चॅट दरम्यान इलॉन मस्क म्हणाले की, "हमासच्या खात्माशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. दहशतवाद्यांचा नायनाट करणे गरजेचे झाले आहे. लोकांना मारेकरी बनवण्याचे प्रशिक्षण देणारा हा प्रकार बंद झाला पाहिजे. गाझाच्या भविष्यासाठी हे आवश्यक आहे. मी गाझाच्या पुनर्बांधणीसाठी आणि युद्धानंतर गाझाच्या चांगल्या भविष्यासाठी मदत करीन."