(Image Credit : www.thejakartapost.com)
कॅलिफोर्निया : चंद्रावर फिरायला जाण्याची संधी मिळणे हे सर्वांचच स्वप्न असेल. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. चंद्रावर फिरायला जाण्यासाठी एका उद्योगपतीने अमेरिकेतील स्पेसएक्स कंपनीसोबत करार केलाय. सहा ते आठ कलाकारही त्यांच्यासोबत जाणार आहेत. स्पेसएक्स बिग फाल्कन रॉकेटने या लोकांना चंद्रावर पाठवणार आहे.
जपानी अरबपती आणि ऑनलाईन फॅशन उद्योगपती युसाकू माइजावा हे २०२३ पर्यंत स्पेसएक्स रॉकेटच्या माध्यमातून चंद्रावर फिरायला जाणारे पहिले सर्वसामान्य व्यक्ती असतील. १९७२ च्या शेवटच्या अमेरिकी अपोलो मिशननंतर माइजावा(42) हे चंद्रावर जाणारे पहिले प्रवाशी असतील.
त्यांनी यासाठी किती रक्कम मोजली आहे याबाबत काही खुलासा करण्यात आलेला नाहीये. माइजावा यांनी कॅलिफोर्नियातील हॉथोर्न येथील स्पेसएक्स मुख्यालय आणि रॉकेट फॅक्टरीला भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, 'बालपणापासूनच माझं चंद्रावर प्रेम आहे. चंद्रावर जाणे हे माझं स्वप्न आहे'.
फोर्ब्सनुसार, माइजावा हे जपानमधील सर्वात मोठ्या ऑनलाइन फॅशन मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि ते जपानचे १८वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे तीन अरब इतकी संपत्ती आहे.
माइजावा यांनी सांगितले की, कलेच्या प्रेमापोटी त्यांनी या प्रवासात काही कलाकारांना आमंत्रीत करण्याचा निर्णय घेतलाय. ते म्हणाले की, 'मी या चंद्र अभियानासाठी माझ्यासोबत जगभरातून सहा ते आठ कलाकारांना घेऊन जाणार आहे. हे कलाकार पृथ्वीवर परत आल्यावर काही कलाकृती तयार करतील. या कलाकृतींच्या माध्यमातून सर्वांना प्रेरणा मिळणार'.
स्पेसएक्स या कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांनी सांगितले की, हे अभियान बिग फाल्कन रॉकेटने होणार. बीएफआरची पहिल्यांदा घोषणा २०१६ मध्ये करण्यात आली होती आणि याला अंतराळ यान इतिहासातील सर्वात शक्तीशाली रॉकेट सांगण्यात आले होते.