वॉशिंग्टन : अमेरिका- मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याची आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आपण देशात आणीबाणी जाहीर करत आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जाहीर केले. या घोषणेमुळे ट्रम्प यांना भिंत उभारण्यासाठी निधी उभारणे शक्य होणार आहे.ट्रम्प यांनी याबाबतचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यावर ट्रम्प यांच्यावर टीका होत असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे. ट्रम्प यांना कायदेशीर आव्हानालाही तोंड द्यावे लागू शकते. देशातील अवैध प्रवासी हे देशावरील आक्रमण आहे, असे ट्रम्प यांनी वारंवार स्पष्ट केलेले आहे. सीमेवरील ३२२ किमी भिंतीसाठी ८ बिलियन डॉलर खर्च करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितलेले आहे. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे.व्यापक विरोधानंतरही ट्रम्प भिंत उभारण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ट्रम्प यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्याने यात आपली हार होऊ नये याची काळजी घेत त्यांनी आणीबाणी घोषित केली आहे. दरम्यान, ट्रम्प हे आणीबाणी जाहीर करणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर डेमोक्रॅटिकने आरोप केला की, ट्रम्प हे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत आहेत. ट्रम्प यांनी २०१६ मध्ये भिंत उभारण्याचा शब्द दिला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या घोषणेला महत्व आहे.
मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत आणीबाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 12:52 AM