यांगून - शेजारील देश म्यानमारमध्ये सत्तांतर झाले आहे. म्यानमारच्या सैन्याने वास्तविक नेत्या आंग सान सू की आणि राष्ट्रपती विन म्यिंट यांना ताब्यात घेतले आहे. तसेच देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे.
म्यानमार सैन्य टेलीव्हिजनने म्हटल्याप्रमाणे, सेन्याने एका वर्षासाठी देशाची सत्ता हाती घेतली आहे. त्यामुळे आता सैन्याचे कमांडर-इन-चीफ मिन आंग ह्लाइंग यांच्याकडे सत्तेची धुरा असणार आहे.
म्यानमार लष्कराचे म्हणणे आहे, की निवडणुकीत गडबड झाल्याने सत्तांतराची कारवाई करण्यात आली आहे. या सत्तांतराबरोबरच देशाच्या विविध भागांत सैन्य तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या सत्तांतराला कुणीही विरोध करू नये म्हणून, म्यानमारमधील मुख्य शहर यांगूनमध्ये सिटी हॉलबाहेर सान्य तैनात करण्यात आले आहे.
म्यानमारमध्ये दीर्घकाळ लष्कराचीच सत्ता राहिली आहे. 1962 पासून ते 2011 पर्यंत देशात सैन्याची हुकुमशाहीची होती. 2010 मध्ये म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि 2011मध्ये म्यानमारमध्ये 'नागरिकांचे सरकार' आले. यात जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना राज्य करण्याची संधी मिळाली होती.
अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी म्यानमारच्या सत्तांतरासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. तसेच म्यानमारच्या सैन्याला कायद्याचा आदर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात, व्हाइट हाऊसचे प्रवक्ता जेन साकींनी म्हटले आहे, 'म्यानमारच्या सैन्याने स्टेट काउंसलर आंग सान सू की आणि इतर काही नागरिक अधिकाऱ्यांना अटक करून देशातील लोकशाही संक्रमण कमी करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.'
म्यानमार सैन्याला इशारा देत अमेरिकेने म्हटले आहे, 'संयुक्त राज्य अमेरिकेने नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालाचे परिणाम बदलण्याच्या अथवा म्यानमारच्या लोकशाही व्यवस्थेला धक्का पोहोचवण्याच्या कुठल्याही प्रयत्नांचा विरोध केला आहे. तसेच हे सत्तांतर संपले नाही, तर जबाबदार लोकांविरोधात कारवाई करण्यात येईल.'