लंडन- अमिरातीमधील एक राजकुमार कतारला पळाला असून त्याने कतारमध्ये आश्रय घेतला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आपल्या जीवाला धोका आहे असा आरोप करत त्याने अबूधाबीच्या राज्यकर्त्यांवर आरोप केले आहेत.
शेख राशिद बिन हमाद अल-शराकी असं या राजकुमाराचं नाव असून तो 31 वर्षांचा आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या 7 राजघराण्यांपैकी एक आमिर फुजायरा यांचा तो दुसरा मुलगा आहे. 16 मे रोजीच तो कतारमध्ये आल्याचे त्याने न्यू यॉर्क टाईम्सला सांगितले. अबूधाबी ही संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात श्रीमंत अमिराती आहे. राशिद बिन हमाद अल-शराकीने अबुधाबीच्या सत्ताधाऱ्यांवर ब्लॅकमेलिंग आणि मनी लाँड्रिंगचे आरोप केले आहेत. अबूधाबीमध्ये सामान्य लोकांची हत्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याचाही आरोप त्याने केला आहे.अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. सौदी अरेबियाबरोबर इजिप्त, बहारिन, संयुक्त अरब अमिरातीने कतारशी संबंध तोडले आहेत. कतार दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचा आरोप या देशांनी केला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या आजवरच्या इतिहासामध्ये सत्ताधाऱ्यांच्या वंशजाने असा सत्ताधाऱ्यांवरच आरोप करण्याची ही पहिलीच वेळ आहे.