बँकॉक: बॉसवर नाराज असलेल्या महिला कर्मचाऱ्यानं कंपनीचं मोठं नुकसान केलं आहे. महिला तेलाच्या गोदामात काम करत होती. बॉसवर नाराज असलेल्या महिलेनं तेलाच्या गोदामाला आग लावली. महिलेनं एक कागद लायटरच्या मदतीनं पेटवला आणि तो इंधनाच्या कंटेनरमध्ये टाकला. त्यामुळे प्रपाकॉर्न तेलाच्या गोदामाला आग लागली. यामुळे कंपनीचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.
डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी महिलेचं नाव ऍन श्रिया असं असून ती ३८ वर्षांची आहे. बॉसच्या तक्रारी आणि त्याच्याकडून सतत येत असणरा दबाव यामुळे वैतागलेल्या श्रियानं तेल गोदाम पेटवून दिलं. तिनं कागदाच्या तुकड्याला आग लावली आणि तो तुकडा इंधनाच्या कंटेनरमध्ये टाकला. त्यामुळे नाखोन पाथोम प्रांतातील प्रपाकोर्न तेल गोदामाला भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून परिसरातील नागरिक घाबरले. संपूर्ण गोदामानं पेट घेतला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४० हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास ४ तास लागले.
कंटेनरमध्ये हजारो लीटर तेल होतं. यामुळे कंपनीला जवळपास ९ कोटींचं नुकसान झालं आहे. २९ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी श्रियाला अटक केली. तिनं आग लावल्याची कबुली दिली. बॉस कामावरून त्रास द्यायचे. त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं.
भीषण आगीमुळे १० पेक्षा अधिक घरांचं नुकसान झालं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस कंपनीच्या मालिकाचीदेखील चौकशी करत आहेत. आरोपी महिला गेल्या ९ वर्षांपासून कंपनीत कार्यरत होती. पण ती असं पाऊल उचललं याची कल्पना कोणीही केली नव्हती.