लंडन : चीन जगभरात स्वस्त वस्तुंसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा कमी पैशांत बऱ्यापैकी चिनी वस्तू विकत मिळतात. मात्र, अनेकदा, अशा स्वस्त वस्तूंच्या लोभामुळे ग्राहकांना चुनाही लागतो. असाच चुना आता इंग्लंडला लागला आहे. कोरोनाने इंग्लंमध्येही थैमान घालायला सुरुवात केली आहे. अशात जास्तीत जास्त टेस्ट करण्यासाठी त्यांनी दोन चिनी कंपन्यांकडून तब्बल 20 लाख टेस्टिंग किट विकत घेतल्या होत्या. मात्र या किट निकृष्ट असल्याने इंग्लंडमध्ये धूळ खात पडल्या आहेत.
असा झाला होता सौदा -न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या टेस्टिंग किट्सचा सौदाही गमतीशीर आहे. चीनमधील या दोन कंपन्यांनी 20 लाख किट्ससाठी 20 मिलियन डॉलर्सची मागणी केली होती. इंग्लंडमधील सरकारी अधिकाऱ्यांना हा सौदा थोडा महाग वाटला. यानंतर त्यांनी ही किंमत संबंधित कंपन्यांना कमी करायला सांगितली. मात्र यावर कंपन्यांनी किंमत कमी करण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही, तर गरज असल्यास किट्स घ्या, अन्यथा सोडा, असे कंपन्यांनी म्हटले होते. इंग्लंडसाठीही हा सौदा मोडणे सोपे नव्हते. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही या किटची तारीफ केली होती. ते किट पाहताच म्हटले होते, की ही किट गेम चेंजर ठरू होऊ शकते. कारण ही किट प्रेग्नन्सी टेस्ट किट सारखीच आहे. याचा अर्थ कुणीही अवघ्या मिनिटात या किटच्या सहाय्याने आपली कोरोना टेस्ट करू शकतो.
20 लाख किट्स निरुपयोगी -अखेर इंग्लंड आणि संबंधित दोन कंपन्यांचा सौदा पक्का झाला. आणि दोन आठवड्यांतच इंग्लंडला 20 लाख किट्स मिळाल्या. मात्र, यातील अर्ध्याहून अधिक किट्स ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये धुळ खात पडून आहेत. या सर्व किट्स निरुपयोगी असल्याचे बोलले जात आहे. तसेच या किट्सच्या सहाय्याने तपासणी करण्याचाही काही फायदा नाही. मात्र, यासंदर्भात सरकारच्या वतीने कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, चीनमधून आलेल्या या किट्स निश्चितपणे कुचकामी असल्याचे संकेत मिळत आहेत.
टेस्टची संख्या वाढणार -इंग्लंडमध्ये सरकारने रोज 25 हजार कोरोना टेस्टचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र येथे सध्या 20 हजारपेक्षाही कमी टेस्ट होत आहेत. मात्र, आता या महिन्याच्या अखेरपासून रोज एक लाख टेस्ट केल्या जातील. तर पुढील महिन्यात त्या वाढवून अडीच लाख करण्यात येतील, असे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे.