ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २४ - युरोपियन युनियनमध्ये रहायचे कि, बाहेर पडायचे यासाठी इंग्लंडमध्ये मतदान झाल्यानंतर आता मतमोजणी सुरु आहे. रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना सुरु आहे. युरोपियन युनियनचा विरोध करणारा लिव्ह कॅम्प सध्या आघाडीवर आहे.
लिव्ह कॅम्प ६५ हजार मतांनी पुढे आहे. सडरलँडमध्ये लिव्ह कॅम्पने मोठा विजय मिळवला. प्रारंभीच्या टप्यामध्ये रिमेन कॅम्पने आघाडी घेतली होती. मात्र आता लिव्ह कॅम्प पुढे आहे. नेमके चित्र स्पष्ट व्हायला अजून एक ते दोन तास लागतील.
यूकेमध्ये विविध केंद्रांवर मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. दक्षिण इंग्लंडमध्ये मुसळधार पावसामुळे मतदान प्रक्रिया बाधित झाली. त्यामुळे मतदान केंद्र इतरत्र हलवावे लागले.
यूगव्हने मतदानाच्या दिवशी पाच हजार मतदारांचा ऑनलाइन सर्वे केला. त्यात ५२ टक्के मतदारांनी युरोपियन युनियनच्या बाजूने तर, ४८ टक्क्यांनी बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिल्याचा यू गव्हचा दावा आहे. शुक्रवार सकाळपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल.
युकेच्या जनतेने बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला तर तो २८ देशांच्या युरोपियन युनियनसाठी मोठा धक्का असेल. सकाळी सात ते रात्री दहा अशी मतदानाची वेळ होती. एकूण ४ कोटी ६४ लाख ९९ हजार ५३७ जणांना मतदानाचा अधिकार होता.
आणखी वाचा
इंग्लंडच्या इतिहासात तिस-यांदा अशा प्रकारे जनमताचा कौल घेण्यात येत आहे. 'लिव्ह' आणि 'रिमेन' या दोन्ही बाजूंनी चार महिने जोरदार प्रचार केल्यानंतर आज मतदान पार पडले. मतदानानंतर गुरुवारी रात्रभर मतमोजणी चालणार आहे.
एकूण मतदानापैकी ज्या बाजूला निम्म्यापेक्षा जास्त मते मिळतील त्याला विजयी घोषित करण्यात येईल. इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समधील नागरीकांनी मतदानाचा अधिकार बजावला.