- केदार लेले (लंडन)
इंग्रजी भाषेचा विचार करताना विरोधाभासाला पॅराडॉक्स आणि आयरनी असे दोन जवळचे आणि तोलामोलाचे पर्यायी शब्द सापडले. भाषा पंडित म्हणतात की पॅराडॉक्सने बसणारा धक्का अनुकूल असतो, तर आयरनीतील धक्का प्रतिकूल असतो! मराठी मध्ये पॅराडॉक्स या इंग्रजी शब्दाला 'विरोधाभास’ हाच सगळ्यात जवळचा शब्द असावा. मराठी भाषेच्या भाषावैभवाचा अभ्यास करताना, विरोधाभास या एका शब्दाने चांगलचं छळलं!प्रत्यक्षात नसणारा विरोध, पण सकृतदर्शनी भासणारा अशालाच विरोधाभास (पॅराडॉक्स) म्हणतात! विसंगती भासते, पण वास्तवात ती नसतेच! विरोधाभासबद्दल विचार करताना इंग्लंड वास्तव्यात अनुभवलेले अनेक रम्य विरोधाभास निदर्शनास आले, त्यातूनच या देशातलं आणि या भाषेतलं विरोधाभासाचं महत्त्व उलगडत गेलं.
इंग्लंडमधे जाणवलेले काही रम्य विरोधाभास या लेखाच्या माध्यमातून मांडायचा मी इथे प्रयत्न करणार आहे.
इंग्लंड आणि स्कॉटलंड यांतील धर्मसुधारणासोळावे शतक सुरु होई पर्यंत इंग्लंडचा राजधर्म रोमन कॅथलीक (ख्रिश्चन धर्मातील एक पंथ) होता! साधारण त्याच वेळेस यूरोपमधील धर्मसुधारणेची हवा इंग्लंड आणि स्कॉटलंडला देखील लागली. यूरोपमधील धर्मसुधारणेवर ल्यूथरचे आंदोलन आणि विशेषतः इरॅस्मसचा ख्रिस्ती मानवतावाद यांचा प्रभाव होता; पण, इंग्लंडमधील धर्मसुधारणेच्या मागची प्रेरणा बरीचशी राजकीय स्वरूपाची होती.आठवा हेन्री, सहावा एडवर्ड आणि हेन्रीची थोरली मुलगी मेरी (क्वीन ऑफ स्कॉटलंड) या तिघांच्याही कारकीर्दीं प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक या दोन ख्रिस्ती धर्मपंथांत झालेल्या झगडयांकरितां प्रसिध्द आहेत. राजा आठवा हेन्री याने पुत्रसंततीच्या व सुंदर स्त्रियांच्या लोभास बळी पडून एकामागून एक सहा बायका केल्या, व नवी बायको करण्यांकरिता आधीच्या बायकोचा वध करण्याचा अत्यंत क्रूर व उलटया काळजाचा मार्ग स्वीकारला. तसेंच पहिल्याच बायकोच्या घटस्फोटाला पोपची परवानगी मिळेना म्हणून नूतनोत्पन्न प्रोटेस्टंट पंथ स्वीकारून त्याने पोपची सत्ता अमान्य केली. त्यानंतर सन १५३४ मध्ये इंग्लंडच्या राष्ट्रीय चर्चची (अँग्लिकन चर्च) स्थापना करीत त्याने स्वतःच्या हातीं धर्मसत्ता घेतली. आठव्या हेन्री मुळे इंग्लंडमध्ये धार्मिक सत्तांतर होऊन राजघराणेच चर्चचे ‘सुप्रीम हेड’ झाले!
आठव्या हेन्रीनंतर सहावा एडवर्ड गादीवर आला. पण, एडवर्ड अल्पवयी असल्यामुळें राज्यकारभार पहाण्याकरितां सोळा सदस्यांचे मंत्रिमंडळ नेमण्यात आले. त्यांनी प्रोटेस्टंट पंथ इंग्लंड मध्ये दृढमूल करताना रोमन कॅथलिकांचा छळ केला. एडवर्डमागून आठव्या हेन्रीची मुलगी मेरी गादीवर आली. कॅथलिक पंथी मेरी (क्वीन ऑफ स्कॉटलंड) ही इंग्लंडची राणी झाल्यावर तिनें प्रोटेस्टंटपंथीयांचें निर्मूलन करण्याकरितां, त्यांना जिवंत जाळण्याचा सपाटा चालविला. मेरीच्या अशा जुलमी राजवटीमुळेच की काय तिला इतिहासकारांनी ‘ब्लडी मेरी’ असे देखील संबोधले! मेरीनंतर सन १५५८ मध्ये तिची बहीण पहिली एलिझाबेथ ही इंग्लंडची राणी झाली. पण, तिच्या आधी झालेल्या तीन राजकीय कारकीर्दीतील उथळ आणि अनागोंदी कारभारामुळे इंग्लंडचा राजधर्म कधी रोमन कॅथलिक तर कधी प्रोटेस्टंट असा एकमेकांना खो देत बदलत राहिला.
एलिझाबेथ पहिली हिच्या कारकीर्दीत इंग्लंडमधील धार्मिक दृष्टिकोन व राजकीय दृष्टिकोन हे वेगळे झाले. तिने प्रोटेस्टंट पंथाला पाठिंबा दिला, पण समावेशक राष्ट्रीय चर्च (अँग्लिकन चर्च) च्या संकल्पनेचा पुरस्कार देखील केला. म्हणजे ख्रिस्ती धर्मसिद्धांतांचे वेगवेगळे अर्थ लावणारे लोक (कॅथलिक आणि प्रोटेस्टंट) एकाच चर्चमध्ये नांदू शकतात, ही संकल्पना तिने उचलून धरली! प्रोटेस्टंट सुधारणा अवलंबणार्या चर्च ऑफ इंग्लंडला कॅथलिक आणि प्रोटेस्टंट ह्या दोन्ही पंथांचे मिश्रण मानले जाते, ज्याचे श्रेय पहिली एलिझाबेथ राणी हिला जाते! अँग्लिकन चर्च मध्ये ख्रिश्चन धर्मातील कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हे दोन्ही पंथ एकत्र नांदत आहेत या सारखा रम्य धार्मिक विरोधाभास तो काय?
आधुनिक लोकशाही आणि राजघराण्याचे अस्तित्वइंग्लंडचे राजघराणे हे येथील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अभिमानस्थळ आहे. राजघराण्यातील व्यक्तींच्या चांगल्या कामाबद्दल इंग्लंडचे नागरिक त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. तसेच राजघराण्यावर सरकारी तिजोरीतून अमाप पैसा खर्च केला जातो म्हणून हेच नागरिक प्रसारमाध्यमांतून राजघराण्यावर प्रखर टीका सुद्धा करतात. पण इंग्लंडमधील राजघराण्याची परंपराच नष्ट करा फार जोरदार आग्रह कोणी धरत नाही. आपली परंपरा, इतिहास टिकवणे हे जणू आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे असे इंग्लंड मधील नागरिकांना वाटते. ते त्यांच्या बोलण्यातून दिसण्यापेक्षा कृतीतून जास्त दिसते, आणि म्हणूनच की काय, पण या देशात राजघराणे महत्त्वाचे मानले जाते!
एक काळ असा होता जेव्हां इंग्लंडवर राजघराण्याचे राज्य आणि मक्तेदारी होती. आणि त्यातूनच आधुनिक लोकशाहीचा उगम इंग्लंडमध्ये झाला. पण सद्य परिस्थिती अशी आहे की, इंग्लंड मध्ये लोकशाही राजवटीने राजघराण्याची नामधारी का होईना पण परंपरा टिकवून धरली आहे! राजघराण्याचे राज्य आणि मक्तेदारी असलेल्या देशात लोकशाही जन्माला येणं आणि त्याच लोकशाहीने राजघराण्याची परंपरा टिकवून धरणं या सारखा शासकीय विरोधाभास शोधून सुद्धा सापडणार नाही!
क्रिकेट आणि फुटबॉलइंग्लंड हे जगातील बहुतेक सर्वच अतिलोकप्रिय खेळांची जन्मभूमी किंवा माहेरघर आहे. आधुनिक फुटबॉल, क्रिकेट, टेनिस,बॅडमिंटन, रग्बी, हॉकी या सर्वांची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. यांचे सर्वांचे आधुनिकीकरण, नियमावली तयार करण्याचे श्रेय इंग्रजांनाच जाते! १८ व्या शतकात केवळ उच्चकुलीन लोकांसाठी क्रिकेट, तर कामगार आणि गरिबांचा खेळ म्हणजे फुटबॉल अशी सामाजिक दरी अस्तित्वात होती. ब्रिटिश साम्राज्यात फुटबॉल सर्व वसाहतींमध्ये पोहोचला. त्या सुमारास फुटबॉलचे आधुनिकीकरण सुरु झाले. रस्त्यांवर, कामगारवस्त्यांमध्ये रानटीपणे खेळला जाणारा हा खेळ मोकळ्या मैदानांवर खेळला जाऊ लागला. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमधील इतर देशात इंग्रज फुटबॉलवेड्यांनी फुटबॉल खेळ पोहोचवला व पहाता पहाता हा खेळ केवळ इंग्लंड मध्येच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय खेळ बनला! उच्चकुलीन लोकांसाठी खेळला जाणाऱ्या क्रिकेटवर, गरिबांचा खेळ म्हणून काहीसा हिणवल्या गेलेल्या फुटबॉलने लोकप्रियतेत आणि आर्थिक दृष्ट्या केलेली मात या सारखा खेळीमेळीचा विरोधाभास शोधून सापडणार नाही!
इंग्लंड मधील फुटबॉलचा मागोवा घेत जाताना लक्षात येते ती म्हणजे खेळाडूंची फॅशन! फुटबॉल म्हंटले की पेले, मॅरेडोना, मेस्सी यांच्यानंतर; इंग्लंड, ब्रिटन आणि जगात लोकप्रिय असलेली आणखी दोन नावं म्हणजे ‘सर अलेक्स फर्ग्युसन’ आणि ‘डेविड बेकहॅम’! डेविड बेकहॅमचे नाव घेताच एक गोष्टी ठळकपणे जाणवते जी म्हणजे त्याने घेतलेल्या अविस्मरणीय ‘फ्री किक्स’. पण, त्याहून प्रकर्षाने लक्षात येतात ते म्हणजे त्याच्या शरीरावर असलेले विविध टॅटू!
गोंदण आणि टॅटूगोंदण म्हणजे सुई किंवा काटा यांच्या साहाय्याने अंगाच्या कातडीवर नक्षी काढणे किंवा शरीरावर काहीतरी चिन्ह काढणे. चित्र किंवा प्रतिमा टोचून घेण्याची क्रिया म्हणजे गोंदण. ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील ही एक कला. पण याच गोंदण्याच्या प्रक्रियेला टॅटूचे गोंडस नाव दिले गेले. उत्तम मार्केटिंग द्वारे ही कला विकसित केली गेली आणि गोंदण्यासाठी संपूर्ण शरीराचे दालन खुले झाले! त्यानंतर फॅशनच्या नावाखाली जगातील सामन्य जनते पासून अनेक सुपरस्टार्सनी आपल्या शरीरावर विविध ठिकाणी टॅटू गोंदवले.आधी म्हंटल्या प्रमाणे डेविड बेकहॅमच्या शरीरावर विविध टॅटू आहेत, पण त्याच्या डाव्या हातावर ‘व्हिक्टोरिया’ असा देवनागरीत गोंदवलेला टॅटू सर्वात जास्त भाव खाऊन जातो. एका प्रसिद्ध इंग्लिश माणसाच्या हातावरचा देवनागरीत गोंदवलेला टॅटू सगळ्यात जास्त प्रसिद्ध होणे या सारखा सुंदर विरोधाभास तो काय!
गोरं दिसणं आणि टॅन होणंलंडन ला आलो आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे, गोऱ्यांना आपल्या सारखी त्वचा हवी असते. त्यांना टॅन व्हायचं असतं. त्या विरुद्ध परदेशस्थ भारतीयांना मात्र गोरं व्हायचं असतं! ‘गोरं असणं म्हणजे सुंदर असणं’ हा विचार कदाचित जन्मापासूनच आपल्यावर बिंबवला जातो आणि असा गैरसमज, अजूनही भारतीय समाजात ठामपणे रुजलेला आहे! आणि म्हणूनच कि काय परदेशस्थ भारतीय गोरं व्हायचा प्रयत्न करतात आणि इथले गोरे टॅन व्हायचा. पिकतं तिथे विकत नाही म्हणतात ते खोटं नव्हे!आहे ना हा एक रंगीबेरंगी विरोधाभास? जो आपल्याला एक वेगळीच अनुभूती देऊन जातो!
मराठी माणूस एकत्र येणंआणखी एक ठामपणे रुजलेला विचार आणि समज म्हणजे, ‘मराठी माणूस कधीच एकत्र येऊ शकत नाही!’. सर्वप्रथम मराठी माणसाच्या एकत्रीकरणाचं श्रेय शिवाजी महाराजांना जातं! पण, सन १८१८ ला संपुष्टात आलेल्या मराठेशाही नंतर जर का कोणाला हे श्रेय जातं तर ते म्हणजे लोकमान्य टिळक यांना! त्यानंतर हे श्रेय प्रख्यात लेखक आणि राजकारणी स्वर्गीय न. चि. केळकर (१९३२ मध्ये ‘महाराष्ट्र मंडळ लंडन’ ची स्थापना) आणि भारताचे उच्चायुक्त श्री. बाळासाहेब खेर (दुसऱ्या महायुद्धा नंतर १९५२ मध्ये पुन्हा कार्यक्रमांना सुरवात) यांना जातं!