ठळक मुद्देकेंब्रिज न्यूज वर्तमानपत्राने केलेल्या चुकीमुळे सोशल मीडियावर टीका केली जात आहे.
लंडन- वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक असो वा कोणतेही मुद्रित माध्यम. बातम्या आणि लेखांमध्ये नजरचुकीने किंवा इतर कारणांनी तसेच तांत्रिक कारणांमुळे चुका राहून जातात. बऱ्याचदा अशा चुकांमधून वाद किंवा विनोदही निर्माण होतात. अशा चुका समाजमाध्यमांमध्ये ठळकपणे दाखवल्या जाऊन त्या पसरवल्याही जातात. पण इंग्लंडमध्ये असणाऱ्या केंब्रिज न्यूज वर्तमानपत्राने मात्र विसराळूपणाची मर्यादा ओलांडत पहिल्या पानावरची हेडलाइन देण्यासच विसरले आहे.
काही वर्षांपुर्वी मुद्रित माध्यमांमधील चुकांवरुन उपसंपादकांच्या डुलक्या, मुद्राराक्षसांचा विनोद अशा नावांनी साप्ताहिकांमध्ये सदरं चालवली जात. त्यामध्ये वर्तमानपत्रांमधील चुकांवरुन विनोद निर्माण केलेले असत. केंब्रिज न्यूजकडून झालेली चूक मात्र यासर्व विनोदांपेक्षा मोठी आहे. वर्तमानपत्रात बहुतेक वेळेस उपसंपादक किंवा पाने लावणाऱ्या आर्टिस्टना संपादकांनी कोठे किती आकाराचे आणि किंवा किती शब्दांचे हेडिंग द्यावे याच्या सूचना केलेल्या असतात. त्याप्रमाणेच ''येथे 100 पॉइंट आकाराची हेडलाइन द्यावी'' अशी संपादकांनी दिलेली सूचना जशीच्या तशी छापून प्रसिद्ध झाली आहे. हे लक्षात आल्यावर केंब्रिज न्यूजवर वाचक तर तुटून पडलेच तर ट्वीटरवरही वाचकांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
वाचकांच्या या टीकेनंतर केंब्रिज न्यूजने हेडलाइन छापायला विसरल्याबद्दल माफी मागितली आहे. वर्तमानपत्राच्या आजवरच्या इतिहासातील कदाचित ही सर्वात मोठी चूक असली तरी ट्वीटरवर टिकाकारांना यामुळे भरपूर खाद्य मिळाले आहे.