Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेल्या तालिबानकडून पाकिस्तानला अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात आणि यातून अण्वस्त्र तालिबान्यांच्या ताब्यात जाण्याची भीती आहे याबाबतची योग्य काळजी पाकिस्ताननं घ्यावी, असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी केलं आहे. अफगाणिस्तानात नेमकं काय झालं आणि यापुढील अमेरिकेची रणनिती काय असेल या प्रश्नांची उत्तरं बायडन यांनी द्यायला हवीत अशी मागणी अमेरिकी खासदारांनी केली आहे. (Ensure that Taliban do not destabilise Pakistan and acquire nuclear weapons: US lawmakers to Biden)
अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या कब्जानंतर आता त्यांच्याशी बातचित अमेरिका करणार का? अफगाणिस्तानच्या सीमांचं तालिबानकडून संरक्षण केलं जाऊ शकतं का? शेजारील देशातील अण्वस्त्र ताब्यात घेण्यासाठी तालिबानकडून पाकिस्तानला अस्थिर करण्याचे प्रयत्न कशावरुन केले जाणार नाहीत?, असे सवाल अमेरिकेच्या खासदारांनी उपस्थित केले आहेत.
अमेरिकेतील सीनेट आणि प्रतिनिधी सभेच्या ६८ सदस्यांच्या समूहानं बुधवारी बायडन यांना एक पत्र लिहिलं आहे. यात अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबानकडून भविष्यात अण्वस्त्र ताब्यात घेतली जाणार नाहीत यासाठी तुम्ही काही रणनिती आखली आहे का? असं बायडन यांना विचारण्यात आलं आहे.
तालिबान्यांनी वाऱ्याच्या वेगानं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला हे संपूर्ण जग आज पाहातंय. याचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्याची माघार आणि तेथील अमेरिकन नागरिकांची सुटका यात खूप तफावत झाली. खूप वेळ वाया गेला. तालिबान शासनमध्ये आज अशी स्थिती आहे की महिलांना, मुलींचा छळ, नागरिकांचे हक्क हिरावून घेणं आणि असंख्य अफगाणी नागरिकांचं स्थलांतर होत आहे. यात चीन या सर्व परिस्थितीचा फायदा घेत असून तालिबानसोबत आपले संबंध मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न करत आहे. याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात असंही अमेरिकन सीनेटच्या सदस्यांनी म्हटलं आहे.