किव्ह - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता नवे वळण लागताना दिसत आहे. युद्धाला नऊ महिने उलटत असतानाच रशिया बॅकफूटवर जात असल्याचे दिसत आहे. हल्लीच रशियन सैन्याने युक्रेनमधील खेरसान शहरातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रशियन सैन्याने नैराश्यातून घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, किव्हमधील मीडियाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत खेरसानमध्ये ४० रशियन सैनिकांना युक्रेनी सैन्याने ठार मारले आहे. तर ३ मिलिट्री वाहने नष्ट केली आहेत.
द कीव्ह इंडीपेंडेंटच्या रिपोर्टनुसार युक्रेनच्या दक्षिण ऑपरेशनल कमांडने १२ नोव्हेंबर रोजी मुख्यालयाला माहिती देताना सांगितले की, त्यांनी गेल्या २४ तासांमध्ये साऊथ फ्रंटवर ४० रशियन सैनिकांना ठार मारले आहे. तर तीन लष्करी वाहने नष्ट केली आहेत. त्याबरोबरच रशियाने काळ्या समुद्रामध्ये आपली हालचाल वाढवल्याचेही दक्षिण ऑपरेशनल कमांडने सांगितले.
एकीकडे युक्रेनी सैन्य रशियन सैन्य माघारी परतत असल्याचा आनंद व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे ही रशियाची कुठली तरी चाल असल्याची शंका युक्रेनच्या लष्कराला वाटत आहे. यापूर्वीही रशियन सैन्याने अशाच प्रकारे माघार घेऊन नंतर जोरदार हल्ले चढवले होते.