तेहरान : इराणच्या दौऱ्यावर असलेल्या तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना ताटकळवत ठेवून चांगलाच बदला घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी एर्दोगान यांना पुतीन यांनी दोन मिनिटे मीडिया समोर ताटकळवत ठेवले होते. यामुळे त्यांची जगभर नाचक्की झाली होती. आता एर्दोगन यांनी पुतीन यांना पन्नास सेकंद वाट पहायला लावून बदला पूर्ण केला आहे.
पुतीन दोन्ही नेते भेटणार होते, त्या ठिकाणी आले परंतू समोरील बाजुकडून एर्दोगन दिसलेच नाहीत. यामुळे ते शेकडो कॅमेरांसमोर अस्वस्थ झाले. हा व्हिडीओ जवळपास दोन कोटींहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ तुर्कीच्या न्यूज एजन्सीने जारी केला आहे, यामुळे पुतीन यांना वाट पहायला लावणे हे तुर्कीच्या नीतीचा भाग होते, हे समोर येत आहे.
दोन्ही नेते मंगळवारी तेहरानमध्ये भेटणार होते. रशिया युक्रेन हल्ल्यावरून त्रस्त असताना तुर्कीने रशियाला खिंडीत गाठले आहे. यावरून रशियाची आता जगभरात काय स्थिती आहे हे दाखविण्याचा प्रयत्न तुर्कीने केला आहे. एवढेच नाही तर तुर्कीचे ड्रोन युक्रेनच्या मदतीला आहेत, ते रशियाच्या सैन्यावर एवढ्या आक्रमकतेने हल्ला करत आहेत की रशियाचे कमांडर देखील मारले गेले आहेत.
तुर्कीने रशिया आणि युक्रेनदरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुतीन आणि झेलेन्स्की देखील यासाठी तयार झाले नाहीत. पुतीन यांच्या व्हिडीओमध्ये त्यांचा अस्वस्थपणा स्पष्ट दिसत आहे. यामुळे एर्दोगन जेव्हा खोलीत आले तेव्हा पुतीनच त्यांच्यादिशेने पुढे गेले. २०२० मध्ये पुतीन यांनी एर्दोगन यांना दोन मिनिटे वाट पहायला लावली होती. तेव्हाचा व्हिडीओ देखील या व्हिडीओसोबत व्हायरल होत आहे.
पुतीन हे नेहमीच बैठकांना उशिरा पोहोचतात. परंतू मंगळवारी ते लवकर पोहोचले होते. पुतीन यांनी पोप फ्रान्सिस यांना देखील सुमारे तासभर वाट पहायला लावली होती. २०१२ मध्ये युक्रेनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष विक्टर यानूकोविच यांना चार तास वाट पहावी लागली होती.