अदिस अबाबा : इथियोपियाची राजधानी अदिस अबाबात कचऱ्याच्या एका ठिकाणावर झालेल्या भूस्खलनात ४६ जण ठार झाले, तर १२ हून अधिक जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून एका पत्रकाराने सांगितले की, कचऱ्याच्या या ठिकाणावरील एक मोठा भाग खचला. त्यामुळे या भागातील अनेक घरे या दुर्घटनेत कोसळली. शहरातील एक अधिकारी डेगमाविट मोग्स यांनी सांगितले की, मृतांचा आकडा ४६ पर्यंत गेला आहे. कचऱ्यातून वस्तू शोधून त्यावर उपजीविका करणारे हे लोक होते. ते या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. यातील बळींचा आकडा वाढू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या भूस्खलनाने शहराबाहेरील मोठ्या भूभागाला तडाखा बसला आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा घटनास्थळी १५० पेक्षा अधिक लोक होते, असे सांगितले जात आहे. महापौर दिरिबा कुमा यांनी सांगितले की, घटनास्थळावरून ३७ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य वेगाने सुरू आहे. तेबिजू नावाच्या एका व्यक्तीने सांगितले की, ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी माझी आई आणि तीन बहिणी होत्या. आता त्या कुठे आहेत याचा शोध मी घेत आहे. या लँडफिलवर दररोज ५०० जण काम करतात. येथे रोज तीन लाख टन कचरा एकत्र केला जातो. या ठिकाणी भूस्खलन होण्याचा इशारा २०१० मध्ये काही अधिकाऱ्यांनी दिला होता. (वृत्तसंस्था)
इथियोपियात भूस्खलनात ४६ ठार
By admin | Published: March 13, 2017 4:06 AM