Ukraine-Russia War: युक्रेन आणि रशियातील युद्ध आता विकोपाला पोहोचलं आहे. रशियानं आक्रमक भूमिका घेत युक्रेनची राजधानी कीव जवळपास ताब्यात घेतली आहे. कीवच्या रस्त्यावर सर्व ठिकाणी रशियन टँक फिरताना पाहायला मिळत आहेत. तसंच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Ukraine President Volodymyr Zelenskyy) यांनी सैन्य बंकरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती मिळत आहे. पुतीन यांना रोखण्यासाठी युरोपियन युनियननं (UN) देखील मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. यूएननं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांच्याशी निगडीत युरोपातील संपत्ती गोठविण्याचे आदेश दिल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं दिली आहे. यामुळे रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न युरोपियन युनियननं सुरू केला आहे.
रशियानं युद्धाचा निर्णय घेतल्यामुळे याआधीच युरोपियन युनियन आणि अमेरिकेनं अनेक आर्थिक निर्बंध रशियावर लादले आहेत. त्यात आता पुतीन आणि लावरोव्ह यांची युरोपातील निगडीत संपत्ती गोठविण्याचा निर्णय घेऊन यूएननं मोठा धक्का दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. यात दोन्ही देशाचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, आता ही युद्धजन्य परिस्थिती निवळण्याची शक्यता आहे. कारण रशिया युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार झाला आहे. त्यासाठी रशिया आपले एक शिष्टमंडळ चर्चेसाठी युक्रेनला पाठवणार आहे. हे शिष्टमंडळ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. युक्रेनच्या प्रमुख शहरांवर रशियन सैन्याने ताबा मिळवला आहे. रशियन आक्रमणामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. यातच रशियाने युक्रेनधील चेर्नोबिल अणु उर्जा प्रकल्पावर आधीच कब्जा केला आहे.