पॅरिस : दहशतवादी हल्ल्यानंतर अधिकच सतर्क झालेल्या पॅरिससह देशात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तथाापि, अतिरेक्यांविरुद्धच्या या लढाईत फ्रान्स दिवसाला दहा लाख युरो खर्च करीत आहे. म्हणजेच फ्रान्स यासाठी आर्थिक ताकदही उभी करत असल्याचे दिसत आहे. बुलेटप्रूफ जॅकेट आणि मशीनगन घेतलेले जवान देशातील प्रमुख स्थान असलेल्या आयफेल टॉवरच्या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. पॅरिसमध्ये मागील वर्षी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांनी याप्रकरणी स्पष्ट केले आहे की, अतिरेक्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणे हे आमचे लक्ष्य आहे. फ्रान्समध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात १३० जण ठार झाले होते. त्यामुळे पुन्हा असे संकट ओढवू नये म्हणून युरोपीय संघ आता कुठलीही कसर सोडायला तयार नाही. संरक्षण ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचे मत आता युरोपातून व्यक्त होत आहे. त्यामुळे संरक्षणावरील खर्चात वाढ होत आहे. अधिक खर्चासाठी तयार राहावे, असे मत युरोपीय संघाचे अध्यक्ष ज्या क्लाड जंकर यांनी व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)पश्चिम युरोपीय संघाने त्यांच्या खर्चात यापूर्वीच १३ टक्के वाढ केली आहे. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि शेजारी राष्ट्रे संरक्षणाबाबत सतर्क झाली आहेत. जर्मनी पोलीस दलात आणि गुप्तचर खात्यात नव्याने भरती करणार आहे. यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पॅरिस हल्ल्यानंतर युरोपातील सुरक्षेत वाढ
By admin | Published: February 02, 2016 2:30 AM