नवी दिल्ली : तालिबाननेअफगाणिस्तानवर कब्जा केल्यामुळे भारतात राहणाऱ्या शेकडो अफगाणी नागरिकांची काळजी वाढली आहे. चंदीगडमध्ये वास्तव्यास असलेल्या काही अफगाणी नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. तालिबानी महिलांना घरातून पळवून नेत आहेत. महिलांच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी नोंदविल्या. दरम्यान, विमानांत माणसं कोंबून स्थलांतर करत असल्याची भयंकर परिस्थिती अफगाणिस्तानात निर्माण झाली आहे.
पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या परवीन हुसैनी (२४) म्हणाल्या की, मी अफगाणिस्तानच्या बामयान शहरातील आहे. तालिबान आता महिलांचे घरातून अपहरण करत आहे. गत चार- पाच वर्षात महिला स्वतंत्र झाल्या होत्या. त्यांना बाहेर जाऊ दिले जात होते. महिलांचे अधिकार आणि स्वातंत्र्य याची मला काळजी आहे. आता माझ्यासारख्या मुली घराबाहेर पडू शकणार नाहीत. कारण, शरिया कायदा लागू करण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांना अशी अपेक्षा आहे की, संयुक्त राष्ट्रे, अमेरिका, भारत हस्तक्षेप करुन अफगाणिस्तानमधील लोकशाही वाचवतील.
अब्दुल मोनीर कक्कड (३०) म्हणाले की, माझ्या कुटुंबीयांचे काय होईल?, आमचे स्वप्न, भविष्य यांचे काय होईल?, असे अनेक प्रश्न आमच्यासमोर आहेत. पंजाब विद्यापीठात ते पीएच. डी. करत आहेत. त्यांनी सांगितले की, मी कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. देशाबाबत जे समजत आहे ते खूपच वाईट आहे. अहमद बरेक (२२) या वाणिज्यच्या विद्यार्थ्याने सांगितले की, अशी परिस्थिती येईल याचा कधी विचार केला नव्हता.
अफगाणिस्तानचे एक विमान पाडले, ४६ विमानांना उझबेकिस्तानने उतरविलेअफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी बंडखोरांनी शेजारील राष्ट्रांच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. तालिबानी बंडखोरांकडून अफगाणिस्तानच्या विमानांचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. काही विमानांनी उझबेकिस्तानची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उझबेकिस्तानच्या वायुसेनेने हाणून पाडला. अफगाणिस्तानच्या सैन्याचे एक विमान पाडण्यात आल्याचीही माहिती उझबेकिस्तानने दिली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसामध्ये अफगाणिस्तानच्या ४६ विमानांना वायुसेनेने उतरविण्यास भाग पाडले. त्यात ५८५ सशस्त्र कर्मचारी असल्याचा दावा उझबेकिस्तानने केला आहे.
तालिबानी मला ठार मारण्यास कधी येतील?“मी तालिबानींची येथे वाट बघत आहे. मला किंवा माझ्या कुटुंबाला मदत करायला कुणी नाही. मी माझ्या पतीसोबत बसले आहे. तालिबानी माझ्यासारख्या लोकांना ठार मारण्यासाठी येतील,”असे अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला आणि तरुण महापौर झरिफा गफारी (२७) म्हणाल्या. गफारी या मैदान वारदक प्रांताच्या महापौर आहेत. अतिरेकी गटाने देशाची सूत्रे रविवारी हाती घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.