अयन अल-अरब : अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सिरियाच्या कोबाने शहराजवळ सुरू असलेले हवाई हल्लेही इस्लामिक स्टेट अर्थात इसिसची आगेकूच रोखू शकले नाहीत आणि आता या दहशतवादी संघटनेने सीमेवरील या महत्त्वपूर्ण शहराचा मोठा भूभाग आपल्या ताब्यात घेतला आहे. अयन अल-अरब म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या कोबाने शहराच्या एकतृतियांश भागाचा इसिसने ताबा घेतला आहे, असे ब्रिटनमधील सिरियन मानवाधिकार निरीक्षण गटाने म्हटले आहे. रात्रीच्या अस्वस्थ शांततेनंतर गुरुवारी सकाळी शहरात पुन्हा कुर्दिश सैन्य व इसिस दहशतवाद्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री झाली. अमेरिका व मित्रपक्षांच्या हवाई हल्ल्यांमुळे पूर्वेकडील काही जिल्हे गमवाव्या लागलेल्या इसिसने हा भाग हस्तगत करण्यासाठी सकाळी पुन्हा निकराने हल्ला चढविला व गमावलेल्या भूभागावर नियंत्रण प्राप्त करण्यात यश मिळवले. आता पूर्वेकडील सर्व जिल्हे इसिसच्या ताब्यात आहेत. (वृत्तसंस्था)इसिस कोबाने शहरावर ताब्याचा प्रयत्न करत आहे. कारण, हे शहर ताब्यात आल्याने सीमेजवळील संपूर्ण पट्टा त्यांच्या ताब्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)अमेरिका व मित्रराष्ट्रांनी कोबानेजवळील हल्ले वाढविले असतानाही इसिसची आगेकूच सुरू आहे हे विशेष. आंतरराष्ट्रीय आघाडीने २० हवाई हल्ले केले. यामध्ये इसिसचे ४५ दहशतवादी मारले गेले. मात्र, त्यानंतरही इसिसची आगेकूच सुरूच राहिली.
हवाई हल्ल्यानंतरही कोबानेच्या काही भागावर ‘इसिस’चा ताबा
By admin | Published: October 10, 2014 3:30 AM