लंडन : युक्रेनला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) लष्करी युतीमध्ये प्रवेश दिल्यास तिसरे महायुद्ध अटळ आहे, असा सज्जड इशारा रशियाने दिल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे नाटोने मात्र रशियाने अण्वस्त्रांच्या वापरापासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ३० सप्टेंबर रोजी युक्रेनच्या १८ टक्के भागाच्या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा केल्यानंतर काही तासांनंतर, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाटोला सदस्यत्व त्वरित मिळावे यासाठी दावा दाखल केला आहे. अशा पावलांमुळे तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल हे युक्रेनला चांगलेच माहीत आहे, असे रशियाचे म्हणणे आहे.असे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपसचिव अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह यांनी म्हटल्याचे रशियन तास या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. सुरक्षा परिषदेचे उपसचिव वेनेडिक्टोव्ह यांच्या मते युक्रेनचा नाटोच्या सदस्यत्वाचा अर्ज हा दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, कारण पश्चिमेकडील देशांना नाटोच्या युक्रेनियन सदस्यत्वाचे परिणाम समजले आहेत.
पुतीन यांनी नाटोच्या पूर्वेकडील विस्तारासाठी, विशेषतः युक्रेन आणि जॉर्जिया यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांवर वारंवार टीका केली आहे. २१ सप्टेंबर रोजी पुतीन यांनी रशियाच्या संरक्षणासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा इशारा दिला होता.
बेलारूसने ओढली रशियाची री...रशियाचा मित्र बेलारूसनेही रशियाने दिलेल्या महायुद्धाच्या धमकीची री ओढली आहे. जगभरात ठिकठिकाणी सैन्य तैनात केल्याने जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असा इशारा बेलारूसचे नेते अलेक्झांडर लुकाशेनको यांनी दिला आहे.
महायुद्ध नको : फ्रान्सआम्ही युक्रेनला स्वत:च्या भूमीवर संरक्षणासाठी मदत करत आहोत; परंतु रशियावर हल्ला करण्यासाठी ही मदत नाही. रशियाने तत्काळ युद्ध थांबवून युक्रेनच्या स्वायत्ततेचा सन्मान केला पाहिजे, आम्हाला तिसरे महायुद्ध नको आहे, अशी भूमिका फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मांडली आहे.
भारत अलिप्तरशियाने युक्रेनचा काही भाग जोडण्याच्या प्रयत्नांचा निषेध करणाऱ्या मसुद्याच्या ठरावावर भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (यूएनजीए) अलिप्त राहणे पसंत केले. रशिया आणि युक्रेनने शत्रुत्व सोडून तत्काळ संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत येण्याचे आवाहन केले.