लंडन : भारतीय वंशाच्या इसिस दहशतवाद्याच्या बहिणीने त्याला माघारी परतण्याचे आवाहन केले आहे. परतणे म्हणजे तुरुंगात जाणे असले तरी तू माघारी ये, अशी विनवणी तिने केली आहे. अबू रुमायसाह इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी ब्रिटनमधून पळून गेला होता. त्याने एका हातामध्ये आपला तान्हा मुलगा व दुसऱ्या हातात एके-४७ रायफल असलेले स्वत:चे छायाचित्र अलीकडेच टष्ट्वीटरवर शेअर केले होते. अबूचे मूळ नाव सिद्धार्थ धर होते. धर्मांतर करून तो मुस्लिम बनला. त्याला मुस्लिम कट्टरवादी मौलवी अंजेम चौधरी याच्यासह ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटका होताच तो ब्रिटनमधून पळून गेला होता. ‘माझा अत्यंत कनवाळू, उदार भाऊ मुस्लिम, कट्टरवादी बनल्यानंतर ओळख न पटण्याइतपत बदलला आणि याला सर्वस्वी चौधरी जबाबदार आहे’, असे अबूची बहीण कोनिका धर म्हणाली. अबू सध्या इसिससाठी सिरियात लढत आहे. आपल्या भावाला संदेश देताना ती म्हणाली की, चौधरी तुला तुझा आदर्श वाटत असेल तर मला माफ कर, कारण तो आदर्श होऊच शकत नाही. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये चौधरी, धर याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली होती. अल-मुहाजिरुन या कट्टरवादी गटाला कथितरीत्या पाठिंबा दिल्यावरून ही कारवाई करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
कैदेत जावे लागणार असले तरी परत ये...!
By admin | Published: December 04, 2014 12:46 AM