मुंबई - कोरोनाच्या लसीसंदर्भातच सध्या सर्वत्र चर्चा सुरू असल्याचं दिसून येतंय. मॉडर्ना आणि फायजर यांसारख्या मोठ्या फार्मास्युटीकल कंपन्यांनाही कोरोना लसीचा रिझल्ट चांगलाच येईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, इन्फोसिसचं संस्थापक नारायणमूर्ती यांनी कोरोना लस देशातील सर्वच नागरिकांना मोफत देण्यात यावी, असे म्हटलंय. बाजारात लस उपलब्ध झाल्यानंतर कुणालाही त्याच्यासाठी पैसे देण्याची वेळ येऊ नये, असेही नारायणमूर्ती यांनी म्हटलं आहे.
कोरोना लसीचे उत्पादन सुरू असून बाजारात येताच लसीचा परिमाण सकारात्मक दिसला पाहिजे. तसेच, सर्वांनाच ही लस मोफत दिली गेली पाहिजे, असे मला वाटते. पृथ्वीतलावरील सर्वच मनुष्यजातीला ही लस मोफत मिळावी, असे नारायण मूर्ती यांनी म्हटलंय. लस बनविणाऱ्या सर्वच कंपन्यांना संयुक्त राष्ट्र किंवा देशातील सरकारकडून अनुदान दिले पाहिजे. कंपन्यांना फायदा कमविण्यासाठी हे अनुदान नसून लस बनविण्याच्या खर्चाचा मदतनिधी म्हणून द्यावे, असेही मत नारायणमूर्ती यांनी व्यक्त केले.
कोरोना लसीसंदर्भात बिहार निवडणुकांवेळी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात कोरोना लस मोफत देण्याचं आश्वासन बिहारमधील नागरिकांना दिलं होतं. त्यानंतर, भाजपावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. केवळ, बिहारचं का, देशातील इतर राज्यात का नाही, असा प्रश्न अनेकांनी केंद्र सरकारला विचारला होता. तसेच, केंद्र सरकार म्हणून देशातील सर्वच नागरिकांना कोरोनाची लस मोफत देणे ही जबाबदारी नाही का, असाही प्रश्न विरोधक आणि सुज्ञ नागरिकांनी विचारला होता.
लॉकडाऊन हटविण्याची केली होती मागणी
भारताला कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावे लागेल आणि लॉकडाऊन हटवावा लागेल. याचे कारण लॉकडाऊन हटवला नाही तर कोरोनामुळे जेवढे मृत्यू होतील, त्यापेक्षा जास्त लोक उपासमार आणि कुपोषणामुळे मरतील, असे स्पष्ट मत इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी मे महिन्यात केले होते. ते एका उद्योगपतींच्या वेबिनारला मुख्य अतिथी म्हणून संबोधित करत होते. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर भारतात लोकसंख्येच्या पाव ते अर्धा टक्का आहे. याउलट ६.६० कोटी लोकसंखा असलेल्या इंग्लंडसारख्या देशात १४,००० बळी कोरोनाने घेतले आहेत, असे मूर्ती यांनी त्यावेळी सांगितले. लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढला असला तरी आतापर्यंत भारताने कोरोना संक्रमितांची संख्या मर्यादित ठेवली आहे व कोरोनाचा आलेख वर जाऊ दिलेला नाही. ३० जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजवर फक्त ३१ हजार लोक संक्रमित झाले व त्यापैकी १००७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, याकडेही मूर्ती यांनी तेव्हा लक्ष वेधले होते.