वॉशिंग्टन : “जगभरात सर्व काही ‘मेड इन चायना’ आहे. जागतिक उत्पादनात चीनची आघाडी आहे, त्यामुळेच तेथे बेरोजगारीचा प्रश्न कमी आहे. या उलट परिस्थिती पश्चिमी देश आणि भारतात असल्यामुळे तेथे बेरोजगारीची समस्या मोठी आहे”, असे सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतात निर्मितीवर भर द्यायला हवा यावर भर दिला.
अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यादरम्यान टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल म्हणाले की, भारतात कौशल्याची कमतरता नाही, त्याला फक्त निर्मितीशी जोडले तर देश चीनशी स्पर्धा करू शकतो. देशात व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. “तुम्ही १९४०,१८५०, १९६० चा अमेरिका पाहिल्यास लक्षात येईल की, या काळात अमेरिका जगाचे उत्पादन केंद्र होते. सध्या चीनचे त्यावर वर्चस्व आहे. पश्चिमी देश, अमेरिका, भारताने उत्पादन निर्मितीकडे दुर्लक्ष करून ते चीनकडे दिले. उत्पादन निर्मितीतूनच रोजगार निर्मिती होते, भारताला याबाबत विचार करावा लागेल,” असे राहुल म्हणाले.
भारतीय राजकारणात प्रेम, आदर, नम्रतेचा जाणवतो अभावभारतीय राजकारणात प्रेम, आदर, नम्रतेचा अभाव आहे, अशी खंत राहुल यांनी टेक्सासमधील भारतीय समुदायाशी संवाद साधताना व्यक्त केली. ‘भारत हा एक विचार आहे’, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारसरणीवरही त्यांनी टीका केली. ‘भारत हा एक विचार आहे, असे आरएसएस मानते, परंतु भारत हा विविध विचारांचा विविधतेने नटलेला देश आहे, असे आम्ही मानतो.आम्ही अमेरिकेसारखेच आहोत, जेथे प्रत्येकाला सहभागाची संधी दिली पाहिजे, असे मानले जाते”, असे ते म्हणाले.
राहुल लोकशाहीवरील काळा डाग : भाजपराहुल गांधी हे भारतीय लोकशाहीवरील काळा डाग आहेत,” अशी टीका अमेरिका दौऱ्यातील त्यांच्या वक्तव्यावरून भाजपने केली. राहुल यांच्यावर लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत गौरव भाटिया यांनी राहुल गांधी हे अपरिपक्व आणि अंशकालीन नेते असल्याची टीका केली.
‘राहुल गांधी आता बनले रणनीतीकार’‘राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत, तर ते आता सखोल विचार असणारे, उच्च शिक्षित रणनीतीकार बनले आहेत,” असे मत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले. “राहुल गांधींची विचारसरणी सर्वसमावेशक आहे. त्यांच्याकडे असा दृष्टिकोन आहे की भाजपकडून कोट्यवधी रुपये खर्चून प्रसार करण्यात येत असलेल्या दृष्टिकोनापेक्षा तो वेगळा आहे,” असे ते म्हणाले.