बर्लिन : गुन्हे करणाऱ्या निर्वासितांची देशातून सहज हकालपट्टी करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल यांनी मांडला असून त्यावर गंभीर विचार चालू आहे.जर्मनीत नववर्ष दिनाचा जल्लोष साजरा केला जात असताना जर्मन महिलांवर अत्याचार करण्यात आले होते. ते अत्याचार उत्तर आफ्रिकी आणि अरब वंशाच्या नागरिकांनी केल्याचा आरोप या पीडित महिलांनी केला होता. या घटनांचा तपास पोलीस करीत असले तरीही त्यावरही प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे.सध्या जर्मनीत कोणत्याही निर्वासिताला आश्रय दिला जातो. या धोरणामुळे पश्चिम आशियातील हजारो निर्वासितांनी जर्मनीत आश्रय घेतला आहे. या निर्वासितांनीच महिलांवर अत्याचार केले. त्यामुळे जर्मनीच्या निर्वासितांबाबतच्या धोरणावर टीका केली जात आहे. त्यातूनच मार्केल यांचे हे विधान आले आहे.मेंझ येथे पक्ष सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मार्केल म्हणाल्या की, ज्यांनी आश्रयासाठी नोंदणी केली आहे व अशांनी गुन्हा करून ते जामिनावर सुटले असतील तर त्यांचीही हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव आहे. गुन्हे करून लोक कायद्याच्या चौकटी बाहेर राहण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांनाही परिणाम भोगावेच लागतील. मार्केल यांना संसदेकडून मंजुरी मिळवावी लागणार आहे.
नववर्ष दिनाचा जल्लोष चालू असताना या निर्वासितांनी लुटालूट केली आणि महिलांवर लैंगिक अत्याचारही केले होते. या घटनेनंतर संपूर्ण जर्मनीत हल्लेखोरांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे मार्केल यांच्यावरील दडपणही वाढले आहे. त्यामुळेच या समस्येवर आपण कायमस्वरूपी तोडगा काढून कायद्यात दुरुस्ती करू इच्छितो, असे त्यांनी सांगितले.