लंडन : ख्रिस केर्न्सविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला आपण दिलेले स्पॉट फिक्सिंगचे पुरावे अगदी खरे आहेत. मी आपल्या भूमिकेवर ठाम असून अशा खेळाडूवर आजीवन बंदी लावली जावी, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याने व्यक्त केले आहे.लॉर्डस् मैदानावर ‘एमसीसी स्पिरीट आॅफ क्रिकेट काऊड्री’ व्याख्यानमालेत बोलताना मॅक्युलम म्हणाला, ‘‘माझा एकेकाळचा सहकारी केर्न्सविरुद्ध मी दिलेले स्पॉट फिक्सिंगचे पुरावे अगदी खरे असून मी माझ्या मतावर ठाम आहे. केर्न्सवर आयसीसीने आजीवन बंदी लावायला हवी.’’ माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी यांनीदेखील २०१२ मध्ये केर्न्सवर मॅचफिक्सिंगचा आरोप केला होता. नंतर ब्रिटनच्या कोर्टात हे प्रकरण सिद्ध होऊ शकले नाही. तो खटला केर्न्सने जिंकला होता. नंतर मॅक्युलमनेदेखील केर्न्सवर फिक्सिंगचे आरोप करीत सबळ पुरावे दिले होते. आपल्या भाषणात मॅक्युलम म्हणाला, ‘‘माझ्याशी कुणी फिक्सिंगबद्दल संपर्क केला असेल आणि ही माहिती मी व्यवस्थापनाला देणार नसेल तर मीदेखील दोषी आहे. मी ज्या सहकाऱ्यांना केर्न्सविषयी माहिती दिली त्यात माजी कर्णधार आणि माझा मित्र डॅनियल व्हेट्टोरीचा समावेश आहे. आयसीसी अधिकारी जॉन ऱ्होडस् यांना मी आणि व्हेट्टोरीने ही माहिती दिली. ते आम्हा दोघांना हॉटेलच्या खोलीत घेऊन गेले. त्यांनी आमची तक्रार नोट केली, पण रेकॉर्डिंग केली नाही. ते कागदावर लिहित होते. त्याचवेळी मला पटले, की ऱ्होडस् यांची वृत्ती किती बेपर्वाईची आहे. मी त्यांना केर्न्सने दोनदा फिक्सिंगची आॅफर दिली होती, असे सांगूनही त्यांनी ही बाब तपशीलवारपणे सांगा, असे कधीही म्हटले नाही. (वृत्तसंस्था)क्रिकेटचे माहेरघर असलेल्या लॉर्डस्वर मी उभा आहे. मी आपल्या आधीच्या वक्तव्यावर कायम आहे, यात वाद नाही. याआधी मी साऊथवर्क क्राऊन न्यायालयातही तशी साक्ष दिली आहेच. भ्रष्टाचारप्रकरणी आयसीसीकडून खेळाडूंना ताकीद मिळायला हवी, शिवाय त्यांना पुरेशी मदत देण्यात यावी, जेणेकरून खेळाडू व्यावसायिक खेळ करू शकतील. दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या मुद्यावर कुणी खेळाडू काही बोलत असेल आणि पुरावे सादर करीत असेल तर त्याच्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचीदेखील गरज आहे.- ब्रेंडन मॅक्युलम
केर्न्सविरुद्ध फिक्सिंगचे पुरावे खरेच : मॅक्युलम
By admin | Published: June 08, 2016 4:32 AM