प्रश्न- अमेरिकेचा नॉन इमिग्रंट व्हिसा मिळवण्यासाठी मी नातं दाखवणारे कोणते पुरावे द्यावेत?
उत्तर- नात्यांशी संबंधित नॉन इमिग्रंट व्हिसा मिळवण्यासाठी अवलंबून असलेल्या व्यक्तींना (पती/पत्नी आणि 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना) त्यांचे अर्जदार किंवा व्हिसाधारकाशी असलेले नातेसंबंध स्पष्ट करणारी कागदपत्रं द्यावी लागतात. उदाहरणार्थ, विद्यार्थी, तात्पुरते कामगार आणि एक्सचेंज व्हिजिटर्स यांचं ते ज्या व्यक्तीवर अवलंबून आहेत, त्या व्यक्तीशी खरंच नातं असावं आणि मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला या नातेसंबंधाची खात्री पटलेली असावी. नॉन इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या अतिशय जास्त असल्यानं यासाठी होणाऱ्या मुलाखतींना कमी वेळ लागतो. अनेकदा त्या 5 मिनिटांहून कमी वेळात आटोपतात. यावेळी तुम्ही विचारण्यात आलेल्या प्रश्नांना खरी आणि थेट उत्तरं द्यायला हवीत. यासोबतच तुमच्या नात्याचे योग्य पुरावे देणं गरजेचं आहे. मुलाखत घेणारा अधिकारी तुम्ही दिलेल्या उत्तरांवरून आणि कागदपत्रांवरून तुमचं नातं खरं आहे का याचा निर्णय घेतो.
विवाह दाखला, जन्म दाखला यासारखी तुमचं नातं स्पष्ट करणारी कायदेशीर कागदपत्रं तुम्ही आणणं आवश्यक आहे. अशा कागदपत्रांच्या इंग्रजीत भाषांतर केलेल्या साक्षांकित प्रती आणल्यास ते फायदेशीर ठरेल. याशिवाय काही अतिरिक्त कागदपत्रंही उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ, तुमच्या जोडीदाराकडे जर H1B तात्पुरता कामगार व्हिसा असेल, तर तुम्ही त्याच्या पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत आणू शकता. याशिवाय त्याने भरलेल्या कराची कागदपत्रंदेखील आणू शकता. त्यामधून तुमचा जोडीदार अमेरिकेत कायदेशीरपणे काम करतो, हे स्पष्ट होतं.
व्हिसासाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीत खरी आणि पूर्ण खरी उत्तरं द्या. तुम्ही इतर अर्जदारांना विचारण्यात आलेले प्रश्न ऑनलाईन वाचून त्या अनुषंगाने"योग्य" उत्तरांची तयारी करू शकता. पण प्रत्येक मुलाखत वेगळी असते आणि मुलाखत घेणारा अधिकारी निर्णय घेताना अर्जदाराच्या परिस्थितीचा विचार करतो. काऊन्सिलर ऑफिसर प्रत्येक अर्जात व्यक्तीशः लक्ष घालतात आणि व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक मुद्द्यांचा विचार करतात. तुम्हाला ऑनलाइन सापडणारे किंवा तुमच्या मित्राला विचारण्यात आलेले प्रश्न कदाचित तुम्हाला लागू होणार नाहीत. त्यामुळे मुलाखतीत खरी आणि प्रामाणिक उत्तरं देण्याची तयारी ठेवा. अस्तित्वात नसलेलं नातं दाखवण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे तुमच्यावर कायमस्वरूपी बंदी येऊ शकते. असं झाल्यास भविष्यात तुम्हाला कधीच कोणत्याही प्रकारचा व्हिसा मिळणार नाही.
अनेक जोडीदार लग्नानंतर लगेचच त्यांच्या लग्नापूर्वीच्या आडणावासह डिपेंडंट व्हिसासाठी अर्ज करतात. अशा व्यक्तींनी त्यांचं नातं दाखवणारे कायदेशीर पुरावे दिल्यास त्यांचा अर्ज स्वीकारला जातो.