लंडन: मंगळ ग्रहावरील दक्षिण ध्रुवीय आइस कॅपखाली (बर्फाने आच्छादलेला भाग) द्रव रूपातील पाणी असल्याच्या शक्यतेचे नवे पुरावे संशोधनकर्त्यांना आढळले आहेत.
नेचर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये म्हटले आहे की, रडार तसेच अन्य आकडेवारीचे विश्लेषण केले असता, मंगळाच्या दक्षिण ध्रुवाखाली पाणी असल्याचे दिसते. शेफील्ड विद्यापीठाबरोबर केम्ब्रिज विद्यापीठाने केलेल्या संशोधनात म्हटले आहे की, आइस कॅपच्या पृष्ठभागावरील अंतराळ यान लेजर-अल्टीमीटर मापचा वापर करण्यात आला. पॅनल कॉम्प्युटर मॉडेलच्या भविष्यवाणीशी हे संशोधन मिळतेजुळते आहे. त्यांचे निष्कर्ष बर्फ-भेदक रडार मापच्या अनुरूप आहेत. त्यात मूळ रूपाने बर्फाखाली तरल रूपात पाणी असल्याचे सांगितलेले आहे.
केवळ रडारच्या आकडेवारीवरून पाणी होण्याच्या शक्यतेबद्दल निष्कर्ष काढणे, हा वादाचा विषय आहे. कारण काही अभ्यासामध्ये सुचवलेले आहे की रडारचे संकेत पाण्याच्या द्रव रूपामुळे नाहीत.
संशोधनाचे सह लेखक शेफील्ड विद्यापीठातील फ्रान्सिस बुचर यांनी म्हटले आहे की, या अभ्यासात आजवरचे उत्तम संकेत मिळत आहेत व त्यानुसार मंगळावर पाणी आहे. याचा अर्थ असा आहे की, पृथ्वीवर उप-हिमनदीय तलावांचा शोध करताना आम्ही ज्या महत्त्वाच्या पुराव्यांचा शोध घेत होतो, ते आता मंगळावर आढळले आहेत. द्रव रूपातील जल जीवनासाठी महत्त्वाचा घटक आहे. याचा अर्थ असा नव्हे की, मंगळावर जीवनाचे अस्तित्व असेल. एवढ्या थंड तापमानात द्रव रूपातील पाणी मीठयुक्त असावे, असा अंदाज आहे. तथापि, अशा पाण्यात कोणताही सूक्ष्मजीव असण्याची शक्यता फार कमी असते. पृथ्वीप्रमाणेच मंगळाच्या दोन्ही ध्रुवांवर मोठ्या प्रमाणावर बर्फ आहे. ते ग्रीनलँडच्या बर्फाच्या थराप्रमाणे असण्याची शक्यता आहे.
अनेक शक्यता
संशोधनाचे नेतृत्व करणारे केम्ब्रिजचे स्कॉट पोलर रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रो. नील अरनॉल्ड यांनी सांगितले की, नवीन पुरावे, आपल्या कॉम्प्युटर मॉडेलचे निष्कर्ष व रडार डाटाचे संयोजन यातून अनेक शक्यता पुढे आल्या आहेत. त्यानुसार मंगळ ग्रहावर किमान एका क्षेत्राखाली उपहिमनदीय पाणी द्रव अवस्थेत असल्याचे दिसते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"