दमास्कस : सीरियामधील पामिरा या प्राचीन शहरातील टेम्पल आॅफ बेल उद्धवस्त झाल्याचे उपग्रहाने काढलेल्या छायोचित्रातून निष्पन्न झाले आहे. रविवारी पामिरामध़्ये मोठा स्फोट घडविल्याची माहिती मिळाली होती न त्यामध्ये २००० वर्षे जुन्या मंदिराचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र कितपत नुकसान झाले याबद्दल दुमत होते. अखेर संयुक्त राष्ट्राने उपग्रहाच्या छायाचित्रातून बेल आॅफ टेम्पल उद्धवस्त झाल्याचे स्पष्ट केले.संयुक्त राष्ट्राचा युनोसॅट या उपग्रहाने दिलेल्या छायाचित्रातील माहिती देताना अभ्यासक आयनार जोर्गो म्हणाले, सोमवारी उपलब्ध झालेल्या छायाचित्रानुसार दुर्देवाने हे मंदिर नष्ट झाल्याचे समोर आले आहे त्याचप्रमाणे मंदिराच्या शेजारी असणाऱ्या स्तंभाचेही स्फोटामुळे नुकसान झालेले आहे. इसिसने पामिरा या प्राचीन शहराचा ताबा मे महिन्यामध्ये घेतला त्यानंतर तेथिल स्मारकस्थळांचा विध्वंस करण्याचा सपाटा गेले काही दिवस लावला आहे. पामिरामधील बाल शामिन या मंदिरास गेल्या आठवड्यामध्ये स्फोटके लावून पाडण्यात आले. त्यापुर्वी गेली पन्नास वर्षे येथील इतिहासाचा वसा जपणाऱ्या खालेद असद यांनाही ठार मारून लटकविण्यात आले होते.2000 वर्षांहून अधिक जुना इतिहास असणाऱ्या पामिराचा वारसा आता इसिसमुळे धोक्यात आला आहे. सीरियामधील गृहयुद्ध मार्च २०११ मध्ये सुरु झाले. तत्पुर्वी या शहराला दरवर्षी दीड लाख पर्यटक भेट देत असत. 1000प्राचीन स्तंभ तसेच ५०० हून अधिक प्राचीन कबरी आहेत. इराकप्रमाणे सीरियामधील प्राचीन स्थळे उडवण्याचा सपाटा इसिसने लावला आहे.
पामिरामधील मंदिर उद्धवस्त झाल्याचा मिळाला पुरावा
By admin | Published: September 01, 2015 11:25 PM