भारत आणि चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले. चीनच्या घुसखोरीचा, विस्तारवादी धोरणाचा जगातील मोठ्या देशांनी उघडपणे निषेध केला आणि भारताला पाठिंबा दिला. यात सगळ्यात पुढे अमेरिका आहे. इतकी की, चीनला आशिया खंडात दादागिरी करू देणार नाही, युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं सैन्य भारताच्या बाजूने लढेल, अशी घोषणा ‘व्हाईट हाऊस’ने केली आहे. मात्र, भारताने अमेरिकेवर विसंबून राहणं फारसं योग्य नसल्याचेच संकेत अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिले आहेत. India US Relationship
जॉन बोल्टन हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात – एप्रिल 2018 ते सप्टेंबर 2019 दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. अमेरिका सध्या चीनविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतेय. दक्षिण चीन समुद्रात त्यांनी लष्करी ताकद दाखवली, त्यांच्या लढाऊ विमानांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं, चिनी अधिकाऱ्यांच्या अमेरिकन व्हिसावर निर्बंध घातले, चीनला भिडलेल्या भारताला पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर, एका वाहिनीनं जॉन बोल्टन यांची मुलाखत घेतली. त्यावेळीच, ट्रम्प यांचा काही नेम नसल्याचं सांगत त्यांनी भारताला सावध केलं आहे. Donald Trump on China
भारत-चीन यांच्यात सीमेवरील ताण वाढल्यास डोनाल्ड ट्रम्प भारताला पाठिंबा देतील याची खात्री वाटते का, या प्रश्नावर बोल्टन म्हणाले, ‘‘ते काय निर्णय घेतील हे सांगू शकत नाही. मला तर वाटतं , त्यांना स्वतःलाही याबाबत माहीत नसावं. नोव्हेंबरमधील निवडणुकीनंतर ते काय करतील हेही सांगता येत नाही. चीनसोबतच्या संबंधांकडे ते व्यापारी चष्म्यातून पाहतात. त्यामुळे त्यांची व्यूहरचना किंवा डावपेच त्या आधारेच ठरतील. ते पुन्हा चीनसोबत मोठ्या व्यापारी करारकडेही वळतील. अशावेळी, भारत-चीनमध्ये सीमावाद पेटला तर ते कुणाला पाठिंबा देतील सांगता येत नाही.’’
भारत-चीन यांच्यात गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या वादांची, तणावाची कल्पना ट्रम्प यांना असेल असं वाटत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
''राष्ट्राध्यक्षपदाची आधीच कठीण असलेली निवडणूक आणखी कठीण करील, अशा गोष्टींपासून पुढचे चार महिने ट्रम्प दूरच राहतील. त्यामुळे सीमेवर शांतता टिकून राहावी, हीच त्यांची इच्छा असेल. मग त्याचा चीनला फायदा होवो किंवा भारताला. कुठलीही बातमी नसणं हीच त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे'', अशा शब्दांत जॉन बोल्टन यांनी ट्रम्प यांच्या आजच्या मनोवस्थेचं वर्णन केलं.
संबंधित बातम्याः
चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा
अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज
चीनची चहूबाजूंनी कोंडी! भारताच्या युद्धसरावात पहिल्यांदाच अमेरिकेसह तीन मोठ्या शक्ती एकत्र येणार
चीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेची तयारी, लवकरच उचलणार मोठं पाऊल; व्हाऊट हाऊसचा दुजोरा
चीनचा सर्व देशांशी सीमा वाद, भारताने चोख प्रत्युत्तर दिले - माईक पोम्पीओ
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेने दाखवली लष्करी ताकद; चीनच्या धमकीची उडवली खिल्ली