Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पंतप्रधानपद गमावल्यापासून अडचणीत आले आहेत. कधी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले जाते तर कधी जमावात त्यांच्यावर गोळीबार केला जातो. इम्रानच्या जीवाला धोका असल्याने सार्वजनिक ठिकाणी त्यांना बुलेटप्रूफ सुरक्षा दिली जाते. मंगळवारी लाहोर न्यायालयात हजर येत असताना त्यांनी चक्क डोक्यावर बादली घातल्याचे दिसून आले. याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये इम्रान खान यांच्या आजुबाजूला सुरक्षा रक्षक बुलेटप्रूफ कव्हर घेऊन थांबल्याचे दिसत आहेत. तसेच, स्वतः इम्रान खान यांनी डोक्यावर उलटी बादली घातल्याचे दिसत आहे. मूळात ही बादली नसून, बुलेटप्रूफ कव्हर आहे. ट्विटरवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक इम्रान खान आणि पाकिस्तानला टोमणे मारत आहेत. काही लोक व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणत आहेत की, अशा लोकांना काश्मीर हवंय.
अंतरिम जामीन 13 एप्रिलपर्यंत वाढवलापाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी न्यायालयाने मंगळवारी इम्रान खान यांना तीन प्रकरणांमध्ये दिलेला अंतरिम जामीन 13 एप्रिलपर्यंत वाढवला. लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांचे समर्थक आणि पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षामुळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी खान आणि इतर पीटीआय नेत्यांविरुद्ध पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी आणि सरकारी मालमत्ता आणि वाहने जाळल्याचा गुन्हा दाखल केला होता.