लंडन : मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद (४९) यांना ब्रिटनने राजकीय निर्वासिताचा आश्रय दिला असल्याचा दावा त्यांच्या वकिलाने केला. या दाव्यावर ब्रिटनने अजून भाष्य केलेले नाही. नशीद हे मानवी हक्कांसाठी झगडणारे असून, मालदीवच्या अध्यक्षपदी ते लोकशाही मार्गाने निवडून गेलेले पहिलेच नेते ठरले. नशीद यांना गेल्या जानेवारी महिन्यात पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी ब्रिटनला जाण्याची परवानगी श्रीलंका, भारत आणि ब्रिटनने घडवून आणलेल्या वाटाघाटीनंतर दिली गेली होती. नशीद प्रकरणात ब्रिटनचे सरकार सहभागी झाल्याबद्दल मालदीव सरकारने सोमवारी नाराजी व्यक्त केली आहे. नशीद यांना दहशतवादाच्या आरोपावरून १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. उपचारानंतर ते मालदीवला यायला हवे होते. नशीद ब्रिटनमध्ये उपचारांसाठी आल्यावर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी त्यांचे गालिचा अंथरूण स्वागत केले होते.
मालदीवचे माजी अध्यक्ष ब्रिटनमध्ये राजकीय निर्वासित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 1:27 AM