ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. २९ - पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे राज्यपाल सलमान तसीर यांच्या हत्येप्रकरणी मुमताज कादरीला फाशी देण्यात आली आहे. पहाटे ४.३० वाजता रावळपिंडी शहरातील कारागृहात मुमताज कादरीला फासावर लटकवण्यात आलं. फाशी देण्याअगोदर त्याच्या कुटुंबियांनी त्याची भेट घेतली होती.
जिओ टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार मुमताज कादरीला देण्यात येणा-या फाशीच्या पार्श्वभुमीर देशभरात अलर्ट देण्यात आला होता. काही इस्लामिक संघटनांनी मुमताज कादरीला हिरो केला असल्याने अनेक ठिकाणी हिंसा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. काही ठिकाणी हिंसा झाल्याचंदेखील वृत्त आहे. मुमजात कादरीच्या घराबाहेर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला होता.
पंजाब प्रांताचे राज्यपाल सलमान तसीर यांची त्यांचाच सुरक्षा रक्षक मुमताज कादरीने ४ जानेवारी २०११ला गोळ्या घालून हत्या केली होती. मुमताज कादरीने सलमान तसीर यांच्यावर २७ गोळ्या झाडल्या होत्या. पाकिस्तानातील ईश्वरनिंदेच्या कायद्याला तसीर यांनी केलेला उघड विरोध पाकिस्तानातील जिहादी तत्त्वांच्या जिव्हारी लागला होता. ईश्वरनिंदेच्या कायद्याला विरोध करत तसीर यांनी आशिया बिबीला पाठिंबा दाखवल्यामुळे आपण हे कृत्य केल्याची कबुली मुमताज कादरीने दिली होती.