सरकारमधील तब्बल ४१ मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. देशाला संबोधित करताना माझ्यासाठी हे काम गर्वाचे होते. परंतू आपल्याला पुढे जावे लागणार आहे. सत्तेतील सर्वोच्च पदावर रहायला कोणी कायमचा आलेला नसतो. पुढील पंतप्रधानांना माझा पाठिंबा राहिल, असे जॉन्सन म्हणाले.
ब्रिटनचा पुढील PM कोण? ऋषी सुनक चर्चेत
याचबरोबर पुढील पंतप्रधानाची निवड होईपर्यंत मी पंतप्रधान पदावर कायम राहणार आहे. मला दु:ख होत आहे, मी जगातील एक चांगली नोकरी सोडतोय. पुढील आठवड्यात नव्या पंतप्रधान पदासाठीच्या निवडीची प्रक्रिया सुरु होईल. तेव्हाच नवा पंतप्रधान कोण असेल ते समजेल, असे जॉन्सन म्हणाले.
बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटन आणि युरोप आर्थिदृष्ट्या जेव्हा वेगळा झाला तेव्हा देशाची धुरा सांभाळली होती. उद्योग विश्वाला मोठा हादरा बसणार होता. तेवढ्यात कोरोनाचे संकट आले. या काळातही जॉन्सन यांनी ब्रिटनला तारले होते.
बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील तब्बल ४१ मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे जॉन्सन यांच्या पंतप्रधानपदाची खुर्ची हलली होती. वित्तमंत्री ऋषी सुनक यांनी राजीनामा दिल्यानंतर या बंडाला सुरुवात झाली होती. त्यानंतर एकापाठोपाठ एक मंत्र्याने राजीनामा दिला. आज राजीनामा दिलेल्या मंत्र्यांच्या आकडा ४१ वर पोहोचला. त्यानंतर अखेर बोरिस जॉन्सन यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर या बंडाळीला सुरुवात झाली. मात्र दबावानंतरही जॉन्सन यांनी खंबीर राहत रिक्तपदांवर नियुक्ती करण्याचा धडाका लावत वित्त मंत्रीपदी नदीम जाहवी आणि आरोग्य मंत्रीपदी स्टीव्ह बर्कले यांची नियुक्ती केली होती.