ऑक्सफर्ड : रशियाला पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याची राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची महत्त्वाकांक्षा असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे मत आहे. युक्रेन युद्धात विजय मिळाल्यानंतर ते सोव्हिएत रशियातून पूर्वी फुटून निघालेल्या देशांकडेही त्यांची नजर वळण्याची शक्यता आहे असे काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांना वाटते.रशियातील नागरिकांचे आजच्या रशियापेक्षा पूर्वीच्या सोव्हिएत रशियावरच अधिक प्रेम असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला. त्यामुळे रशियाने आता घेतलेल्या विस्तारवादी भूमिकेला त्या देशातून कमी प्रमाणात विरोध होताना दिसतो. ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या विविध सर्वेक्षणात असे आढळून आले होते की, १९९१ साली सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर त्याबद्दलची आपुलकीची भावना कमी झाली होती. मात्र, सोव्हिएत रशियाबद्दल २०१४ सालानंतर पुन्हा प्रेम उफाळून येण्यास सुरुवात झाली. पुतिन यांच्या लष्कराने क्रिमिया घशात घातला व युक्रेनच्या लुहान्स्क व डोनेत्स्क या प्रांतांमधील बंडखोरांना समर्थन दिले, त्यावेळी या धोरणाला रशियातील अनेक नागरिकांनी पाठिंबा दिला होता.
लविवमध्ये क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात सहा ठार, ११ जण जखमी -युक्रेनच्या पश्चिम भागातील लविव शहरावर रशियाच्या लष्कराने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये सहा जणांचा मृत्यू व ११ जण जखमी झाले. दक्षिण युक्रेनमध्ये रशियाचे सैनिक नागरिकांचा छळ करत असून, अनेकांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केला. या अत्याचारांविरोधात सर्व देशांनी आवाज उठविला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुतीन यांचे स्थान भक्कमऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. स्टीफन व्हाईटफिल्ड यांनी सांगितले की, रशियामध्ये लोकशाही राजवट यावी या विचारसरणीला तेथील अनेक नागरिकांचा विरोध आहे. युक्रेनला युद्धात अमेरिका, नाटो देश करत असल्यामुळे रशियात त्या देशांविरुद्ध संताप आहे. पूर्वीचा सोव्हिएत रशिया असता तर कोणालाही युक्रेन युद्धात हस्तक्षेप करण्याची हिंमत झाली नसती असेही मत रशियातील काही नागरिकांनी व्यक्त केले होते.