- जयंत धुळप अलिबाग : ‘पोलर नाइट’ अर्थात ध्रुवीय रात्र हा काळ अंटार्क्टिका बेटावरील अत्यंत संस्मरणीय आणि महत्त्वाचा कालावधी असतो. या काळात रात्र २४ तासांपेक्षा जास्त काळाची असते. हे केवळ पोलर सर्कल अर्थात ध्रुवीय मंडळातच घडते. दक्षिणी क्षेत्रातील अंटार्क्टिकामधील ‘भारती’ भारतीय संशोधन केंद्र क्षेत्रात ही २४ तासांची रात्र अनुभवास येते आणि ही परिस्थिती सुमारे ४९ दिवस असते. सोमवार, १६ जुलै रोजी ४९ दिवसांची रात्र संपून सूर्योदय अनुभवला, असा अनुभव अंटार्क्टिका एक्स्पिडीशनमध्ये सहभागी असलेले, अलिबाग येथील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेतील संशोधक बागती सुदर्सन पात्रो यांनी सांगितला आहे.१६ जुलै रोजी ‘पोलर नाइट’ संपुष्टात आल्या असल्या, तरी अद्याप आकाश निरभ्र झाले नसल्याने नियमित सूर्यप्रकाश येथे नाही. सतत अंधार असलेल्या परिस्थितीत दैनंदिन कामकाज करणे आव्हानात्मक असते. अशा वेळी येथे कार्यरत टीमचे स्पिरीट (संघ भावना) महत्त्वाचे असते. मानवी ऊर्जा टिकवून ठेवणे आणि काम करण्यासाठी एक उच्च सकारात्मक आत्मविश्वास, अलिप्तपणाला बाजूला सारून, सकारात्मक मानसिकता टिकवून ठेवण्याकरिता टीम स्पिरीट उपयुक्त ठरते, असेही पात्रो यांनी सांगितले.अंधाऱ्या काळात अंटार्क्टिकावर अत्यंत सुंदर आणि विलोभनीय निसर्गचित्र अनुभवास येते. स्वच्छ वातावरणामुळे चंद्र अत्यंत उबदार आणि मोठा दिसतो. तारे प्रकाशमान दिसतात आणि सूर्याच्या अनुपस्थितीत तेच हृदयास ऊर्जा देतात, असा भावुक अनुभवही त्यांनी सांगितला. अंटार्टिका एक्स्पिडीशनमधील आमचे संशोधनकार्य अखेरच्या टप्प्यात आहे. येत्या डिसेंबरमध्ये अलिबागमध्ये परत येईन, असे पात्रो यांनी सांगितले.
अंटार्क्टिका बेटावर अनुभवता येते २४ तासांची रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 5:02 AM