टोक्यो : जपानच्या शास्त्रज्ञांनी किड्याच्या आकाराचे, घोड्याच्या केसाने आच्छादलेले व चिकट द्रव (जेल) असलेले ड्रोन विकसित केले आहे. भविष्यात या ड्रोनच्या साह्याने पिकांचे परागण (पोलिनेशन) करण्यास मदत होईल. मधमाशांची जगभरच जी संख्या घटत जात आहे, ती यामुळे रोखता येईल. या कृत्रिम परागणकर्त्याच्या (पोलिनेटर्स) खालचा भाग हा घोड्याच्या केसाने आणि चिकट अशा जेलने आच्छादलेला असतो. त्यामुळे एका फुलातील परागकण घेऊन ते दुसऱ्या फुलावर टाकता येतात. आमच्या नव्या शोधामुळे आधुनिक शेतीपद्धतीने मधमाशांच्या वसाहतींवर पडलेले ओझे कमी होईल व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल, अशी या संशोधकांना आशा आहे. या संशोधनाचा वापर कृत्रिम परागणांना विकसित करण्यात होऊन मधमाशांच्या कमी होत असलेल्या संख्येचा प्रश्न सोडवण्यास होेईल. हे संशोधन शेतीमध्ये आणि यंत्रमानवात वापरले जाईल, असे जपानमधील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्सड् इंडस्ट्रीयल सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे रसायनशास्त्रज्ञ एईजिरो मियाको यांनी सांगितले. रोबोटिक पोलिनेटर्सला (यंत्रमानवाच्यासाह्याने परागण) परागण कसे करतात याचे प्रशिक्षण ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे दिले जाऊ शकेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे मियाको म्हणाले.२००७ मध्ये मियाको हे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स म्हणून वापरता येतील असा द्रवपदार्थ तयार करण्यात गुंतलेले होते. या त्यांच्या प्रयत्नांतून मानवी केसांना लावायचे मेणासारखा चिकट जेल तयार झाला. आपला प्रयत्न फसला असा त्यांचा समज होता. मधमाशांची कमी होणारी संख्या आणि रोबोटिक इन्सेक्ट्सबद्दलच्या बातम्या वाचून मियाको यांनी घरोघर दिसणाऱ्या माशा आणि मुंग्या यांचा वापर करून जेलचा वापर हा परागकण वेचण्यासाठी होऊ शकतो का याचा शोध सुरू केला.
ड्रोनच्या साह्याने परागण करण्याचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2017 12:24 AM