- मनाेज रमेश जाेशी
मेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अल-जवाहिरीला लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला. या ड्रोन हल्ल्यात अल-जवाहिरी ठार झाला. जवाहिरीच्या आधी अल-कायदाची सूत्रे कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनकडे होती. त्यालाही अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे धडक कारवाई करून ठार केले होते.
अल-जवाहिरीचा जन्म इजिप्तची राजधानी कैरो येथे १९ जून १९५१ रोजी एका सामान्य कुटुंबात झाला होता. तो अभ्यासात अतिशय हुशार होता. अरबी आणि फ्रेंच भाषाही त्याला अवगत होती. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यदेखील डॉक्टर्स आणि स्कॉलर्स होते. जवाहिरी स्वत: डोळ्यांचा निष्णात सर्जन होता.
१९७४ मध्ये वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेतल्यानंतर त्याने पुढे चार वर्षे सर्जरीचा अभ्यास करून मास्टर्स डिग्री घेतली. तो शाळेत असतानाच राजकारणात शिरला. तेथे त्याचा संबंध प्रतिबंधित मुस्लिम ब्रदरहूड या इजिप्तमधील संघटनेसोबत आला. त्याने वयाच्या १५व्या वर्षी या संघटनेचे सदस्यत्व घेतले होते. तेथूनच त्याची दहशतवादाकडे वाटचाल सुरू झाली.
इजिप्त राष्ट्राध्यक्षाच्या हत्येत सहभाग
१९७३ मध्ये इजिप्शियन इस्लामिक जिहादची स्थापना झाली. त्यात जवाहिरी सहभागी झाला. या कट्टरवाद्यांनी १९८१ मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात यांची हत्या केली. या कटात जवाहिरी होता. त्याला अटक झाली होती. सदात यांच्या हत्येच्या आरोपातून तो निर्दोष सुटला. मात्र, बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला तुरुंगवास झाला. १९८५ मध्ये तुरुंगातून सुटका झाल्यावर तो सौदी अरेबियाला गेला. तिथून तो पाकिस्तानात आणि मग शेजारच्या अफगाणिस्तानात गेला. अफगाणिस्तानात त्याने इजिप्शियन इस्लामिक जिहादचा गट स्थापन केला. या गटाने नव्वदच्या दशकाच्या मध्यावर इजिप्तमध्ये सत्तापालट घडवून इस्लामी राज्य स्थापन करण्यासाठी घातपाती कारवाया केल्या, त्यात १२०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला.