रशियाच्या सीमेवर 'पाकिस्तान'सारखा देश बनवण्याचा अमेरिकेचा डाव; जाणून घ्या काय आहे रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 04:01 PM2022-02-22T16:01:52+5:302022-02-22T16:02:08+5:30
चेलानी म्हणाले, 198 वर्षांपूर्वीचा जुना मनरो सिद्धांत पुन्हा एकदा लागू करण्याची अमेरिकेची इच्छा आहे....
युक्रेनवरून रशिया आणि अमेरिका यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. व्लादिमीर पुतीन यांनी पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क आणि लुहान्स्क यांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्यानंतर वाद आणखीनच वाढला आहे. जागतिक घडामोडींचे तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी युक्रेनच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. रशियाच्या सीमेवर 'पाकिस्तान'सारखा देश निर्माण करून मॉस्कोला अडचणीत आणण्याचा अमेरिकेचा डाव असल्याचे चेलानी यांनी म्हटले आहे.
चेलानी म्हणाले, 198 वर्षांपूर्वीचा जुना मनरो सिद्धांत पुन्हा एकदा लागू करण्याची अमेरिकेची इच्छा आहे. मित्र नसलेली कुठलीही शक्ती नाही, हे सुनिश्चित व्हावे, असे त्यांना अपेक्षित आहे. मात्र, तरीही अमेरिकेने रशियाच्या सीमेपर्यंत नाटोचा विस्तार केला आहे. वॉशिंग्टनने बाल्टिक प्रदेशात नाटो सैन्य तैनात केले आहे. युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रे आणि इतर मदतीसाठी सुमारे 18,750 कोटींची गुंतवणूक केली आहे.
नाटोचे विस्तारवादी धोरण युक्रेन संकटाचे कारण?
युक्रेनचे संकट नाटोच्या विस्तारवादी धोरणाशी संबंधित आहे, असे त्यांनी सांगितले आहे. रशियाचे माजी राष्ट्रपती बोरिस येल्तसिन यांनी 1994 मध्येच, युरोप पुन्हा विभागला जाईल, असा इशारा दिला होता.
रशियाला आपल्या शेजारी पाकिस्तान नको!
चेलानी म्हणाले, रशिया आपल्या नैऋत्य सीमेवर 'पाकिस्तान'ची निर्मिती खपवून घेणार नाही, असे पुतीन सांगत आहेत. जागतिक स्तरावर एक मोठी शक्ती म्हणून अमेरिकेची जागा घेण्याच्या दृष्टीने चीन काम करत आहे. तर रशियाचे लक्ष आपल्या सुरक्षिततेवर आहे. अमेरिकेने या गोष्टी समजणे आवश्यक आहे.