बैरूत (लेबनॉन) : बैरूतमधील भीषण स्फोटप्रकरणी बैरूत बंदराच्या १६ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. एका लष्करी अधिकाºयाने ही माहिती दिली. दरम्यान, या स्फोटाच्या चौकशीसाठी फ्रान्समधून २२ सदस्यांचे पथक बैरुतमध्ये दाखल झाले आहे. या पथकाने चौकशीही सुरू केली आहे.
बैरूत बंदरावरील एका वखारीत साठवून ठेवण्यात आलेल्या २,७५0 टन अमोनियम नायट्रेटला आग लागल्याने हा शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात १३0 जण ठार, तसेच ५ हजार जण एकूण जखमी झाले आहेत. स्फोटाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास समितीला चार दिवसांचा अवधी देण्यात आला असल्याची माहिती लेबनॉनच्या विदेशमंत्र्यांनी यापूर्वीच दिली आहे. लष्करी वकील फादी अकिकी यांनी एका निवेदनात म्हटले की, बैरूत बंदराच्या १८ कर्मचाºयांना तपासासाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १६ जणांना अटक करण्यात आली आहे. तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे लोक पोलिसांच्या ताब्यात राहतील. या १६ जणांत काही बंदर व सीमा शुल्क अधिकारी, तसेच काही देखभाल कर्मचारी आणि त्यांच्या व्यवस्थापकांचा समावेश आहे.