अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एक भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानमधील अंतर्गत कामकाज मंत्री मसूद अंदाराबी यांनी देखील स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कारमध्ये घडवून आणलेल्या स्फोटाने काबूल हादरलं आहे. परिसरात वेगाने बचावकार्य सुरू असून जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला असून नाकाबंदी करण्यात आली आहे. याआधी गेल्या मंगळवारी काबूलमध्ये झालेल्या स्फोटात आणि गोळीबारात उपप्रांतीय गव्हर्नरसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार पाहायला मिळत आहे. तालिबान आणि सरकारमध्ये चर्चा सुरू असतानाच हिंसाचाराच्या सत्राला सुरुवात झाली आहे. तसेच याआधी 12 डिसेंबरला काबूलमध्ये झालेल्या रॉकेट हल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर एक जण जखमी झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.