बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात एका पोलीस अधिकाऱ्यासह किमान 34 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहेत. तसेच जवळपास 130 जण जखमी झाले आहेत. मस्तुंगचे सहाय्यक आयुक्त (AC) अताहुल मुनीम यांनी डॉन डॉट कॉमला मृतांच्या संख्येची माहिती दिली. वृत्तानुसार, सिटी स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) मोहम्मद जावेद लेहरी यांनी सांगितले की, एक पोलीस अधिकारीही शहीद झाला आहे.
एसी मुनीम यांनी सांगितलं की, अलफलाह रोडवरील मदीना मशिदीजवळ ईद मिलादुन नबी (पीबीयूएच) जुलूससाठी लोक जमत असताना हा स्फोट झाला. त्यांनी पुष्टी केली की हा स्फोट डीएसपी गिश्कोरी यांच्या कारजवळ झाला. हा स्फोट 'आत्मघाती स्फोट' होता आणि हल्लेखोराने डीएसपी गिश्कोरी यांच्या कारजवळ स्वत:ला उडवलं अशी माहिती एसएचओ लेहरी यांनी दिली आहे.
बलुचिस्तानचे मंत्री जान अचकजई यांनी सांगितलं की, एक बचाव पथक मस्तुंगला पाठवण्यात आलं आहे. ते म्हणाले की, गंभीर जखमींना क्वेट्टा येथे हलविण्यात येत आहे. अचकजई म्हणाले, शत्रूला परकीय मदतीने बलुचिस्तानमधील धार्मिक सहिष्णुता आणि शांतता नष्ट करायची आहे, हा स्फोट असह्य आहे. कार्यवाहक मुख्यमंत्री अली मर्दन डोमकी यांनी स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांना अटक करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पीटीआयचे नेते इमरान इस्माईल यांनी या स्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केला आणि म्हटलं की, 'जे निष्पाप लोकांना मारतात ते अत्याचारी आणि दहशतवादी आहेत.' कायद्याची अंमलबजावणी करणार्या यंत्रणा लवकरच गुन्हेगारांना पकडतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या महिन्याच्या सुरुवातीला याच जिल्ह्यात जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) नेता हाफिज हमदुल्लासह किमान 11 जण स्फोटात जखमी झाले होते. आठवडाभरापूर्वी, एका लेवी अधिकाऱ्यावर बसस्थानकावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.