नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून सूर्यावरील स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारीही सूर्यावर मोठा स्फोट झाला, जो सलग 8 तास सुरुच होता. NASA सोलर डायनॅमिक्स ऑब्जर्व्हेटरी आणि SOHO ऑब्जर्व्हेटरीने याची नोंद केली आहे. याचा थेट परिणाम पृथ्वीवर दिसला असून, जापान आणि दक्षिण-पूर्व आशियात रेडिओ ब्लॅकआउट झाला. आता या स्फोटामुळे निर्माण झालेले सौर वादळ 15 जून म्हणजेच बुधवारी पृथ्वीवरही धडकू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सौर वादळ म्हणजे काय?सौर वादळ म्हणजे सूर्यापासून निघणारी रेडिएशन असते, ज्याचा संपूर्ण सूर्यमालेवर परिणाम पडतो. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावरही याचा मोठा परिणाम होतो. याचा परिणाम पृथ्वीभोवतीच्या वातावरणाच्या ऊर्जेवरही होतो. सौर वादळे अनेक प्रकारची असू शकतात.
अनेक देशांमध्ये रेडिओ ब्लॅकआउट
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कालच्या सौर स्फोटामुळे जापान आणि दक्षिणपूर्व आशियातील अनेक देशांमध्ये शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउट झाले. स्फोटात निघणाऱ्या सौर ज्वाळांचा परिणाम ग्रहांवरही होतो. स्पेस वेदर वेबसाइटनुसार, प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्र देखील सौर फ्लेअरमधून अंतराळात बाहेर फेकले गेले. प्लाझ्माचा वेग ताशी लाखो किलोमीटर होता.
सौर वादळ उद्या धडकू शकतेअमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने एक इशारा जारी केला असून पुढील एका आठवड्यात पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हादरण्याची शक्यता आहे. येथे G-1 आणि G-2 वर्गाची भूचुंबकीय वादळे येऊ शकतात, ज्यांना कमकुवत ते मध्यम वादळे म्हणतात. भारताच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सनुसार, 15 जून रोजी 645 ते 922 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने सौर वादळ पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव काही दिवस टिकेल.