बीजिंग - चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये गुरुवारी सकाळी अमेरिकन दूतावासाबाहेर स्फोट झाला. या स्फोटानंतर परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. मात्र या स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तसेच या स्फोटात जीवित वा वित्तहानीही झालेली नाही.
चिनी नागरिक अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी दररोज ज्या ठिकाणी येतात तेथेच हा स्फोट झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट अत्यंत कमी तीव्रतेचा होता. तसेच हा स्फोट झाला तिथून भारतीय दूतावास हाकेच्या अंतरावर आहे. मात्र भारतीय दूतावासामधील कुठल्याही व्यक्तीला या स्फोटामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. या स्फोटाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित होत असून, त्यात शेकडो लोक स्फोट झालेल्या ठिकाणी पाहत असल्याचे दिसत आहेत. तसेच रस्त्यावरही धूर पसरलेला दिसत आहे.
चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका महिलेला स्वत:वर गॅसोलीन ओतताना पकडले आहे. ही महिला स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे.