तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये आज मोठा स्फोट झाला. या स्फोटात 10 जण जखमी झाले आहेत. स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इस्तंबूलच्या Beyoglu जिल्ह्यात हा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर लोकांनी परिसर रिकामा केला आहे. दरम्यान, स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.
विशेष म्हणजे इस्तंबूलमधील स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाचा आवाज ऐकून लोक हादरले. स्फोटामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. याशिवाय, लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे.
दुसरीकडे, तुर्कीने उत्तर इराकमधील कुर्द लोकांविरोधात हवाई मोहीम सुरू केली आहे, अशी घोषणा तुर्कस्तानचे संरक्षण मंत्री हुलुसी अकर यांनी सोमवारी पहाटे केली आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या व्हिडिओ मेसेजेमध्ये हुलुसी अकर म्हणाले की, तुर्की विमाने आणि तोफखान्याने कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या ठिकाणांवर हल्ला करत आहेत. तत्पूर्वी कमांडो पथक हेलिकॉप्टरमधून आणि जमिनीवरून शेजारच्या देशात दाखल झाले. मोहिमेत ड्रोनचाही वापर करण्यात आला.
याचबरोबर, विमानांनी कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीचे तळ, बंकर, गुहा, बोगदे, दारुगोळा डेपो आणि मुख्यालयावर यशस्वीरित्या मारा केला. हा गट उत्तर इराकमध्ये तळ ठेवतो आणि तुर्कस्थानवरील हल्ल्यांसाठी या भागाचा वापर करतो, असे तुर्कस्तानचे संरक्षण मंत्री हुलुसी अकर यांनी सांगितले. तसेच, तुर्कीने गेल्या अनेक दशकांमध्ये पीकेकेविरुद्ध अनेक सीमापार हवाई कारवाई केली आहे, असेही हुलुसी अकर म्हणाले.