काठमांडू : नेपाळमधील राजकीय घडामाेडींना नाट्यमय वळण मिळाले आहे. नेपाळ कम्युनिस्ट पार्टीने काळजीवाहू पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षातून हकालपट्टी करून २४ तासही हाेत नाहीत, ताेच निवडणूक आयाेगाने ही कारवाई बेकायदेशीर ठरविली आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापले असतानाच, देशात पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण झाली आहे.
नेपाळच्या निवडणूक आयाेगाचे प्रवक्ते राज श्रेष्ठ यांनी सांगितले की, ओली यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविताना पुष्पकमल दहल आणि माधव कुमार यांनी पक्षाच्या कायद्यांचे पालन केलेले नाही. त्याचप्रमाणे, ओली समर्थकांनही दहल यांना हटवून केंद्रीय समितीचा विस्तार करण्याचीही कृती पक्षाच्या कायद्यांना धरून नव्हती.
निवडणूक आयाेगाच्या माहितीनुसार, एखाद्या सदस्यावर कारवाई करण्यापूर्वी त्याला बाजू मांडण्याचा अधिकार पक्षाच्या कायद्यांनी दिला आहे. त्याचे पालन ओली यांच्याविरुद्ध कारवाई करताना झालेले नाही, तसेच पक्षाच्या पदावर नियुक्तीसाठी दाेन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे, असेही आयाेगाने म्हटले आहे.