वॉशिंग्टन, दि. 19 - परराष्ट्रमंत्री म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावत असलेल्या सुषमा स्वराज यांच्या व्यक्तीमत्वावर इवांका ट्रम्पही आकर्षित झाल्या आहेत. सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वात करिष्मा आहे अशा शब्दात इवांका यांनी त्यांचे कौतुक केले. संयुक्त राष्ट्राच्या महासभेसाठी सुषमा स्वराज न्यूयॉर्कला गेल्या आहेत. त्यावेळी त्यांनी इवांका ट्रम्प यांची भेट घेतली. इवांका अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या आहेत. त्याचबरोबर त्या व्हाईट हाऊसच्या सल्लागारही आहेत.
दोघींमध्ये महिला सशक्तीकरण, महिलांना उद्योजक म्हणून उभे करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. नोव्हेंबर महिन्यात हैदराबादमध्ये जागतिक उद्योजक परिषद होणार आहे. त्यासाठी इवांका ट्रम्प हैद्राबादमध्ये येणार आहेत. याविषयावरही दोघींमध्ये चर्चा झाली. मागच्या महिन्यात मोदींनी सुद्धा इवांका यांच्या भारत दौ-याबद्दल टि्वट केले होते.
हैदराबादच्या जीईएस परिषदेत त्या अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. 28 ते 30 नोव्हेंबरमध्ये ही जागतिक उद्योग परिषद होणार आहे. भारत आणि अमेरिकेने संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2010मध्ये ही परिषद सुरू केली असून यंदाचं परिषदेचं हे आठवं वर्ष आहे. जून महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती.
या भेटीनंतर व्हाइट हाऊसच्या रोझ गार्डनमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मोदींनी इवांका यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण दिले होते. मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीनंतर इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून मोदींचे आभार मानले होते. भारतात होणाऱ्या जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी मला भारतात येण्याचं निमंत्रण दिलं, यासाठी धन्यवाद, असं ट्विट इवांका ट्रम्प यांनी केलं होतं. परिषदेसाठी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू हे तीन पर्याय होते.
पण हैदराबाद शहरात आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने सगळ्या पायाभूत सुविधा असल्याते त्या शहराची निवड झाली.जागतिक उद्योजगता परिषदेचं पहिल्यांदा 2010 साली वॉशिंग्टन डीसीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर इस्तंबूल, दुबई, कुआलालम्पूर, मार्राकेश, नैरोबी आणि सिलिकॉन व्हॅली या ठिकाणी परिषद पार पडली.