लंडन: नाकात स्टिक घालून कोरोना चाचणी केली जात असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. काहींनी अशा प्रकारे कोरोना चाचणी करूनही घेतली असेल. कोरोना चाचणीसाठी स्टिक नाकात घातली असताना ती तुटल्याचे प्रकारदेखील घडले आहेत. नाकात स्टिक घालून कोरोना चाचणी करणं त्रासदायकदेखील ठरतं. मात्र आता या चाचणीला अतिशय उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. हार्वर्ड विद्यापीठ आणि एमआयटीच्या संशोधकांनी कोरोना चाचणी करू शकणारा मास्क तयार केला आहे. त्यामुळे कोरोना चाचणी अतिशय सहज होईल, अशा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
हार्वर्ड विद्यापीठ आणि एमआयटीच्या संशोधकांनी तयार केलेला मास्क कोरोना चाचणी करून अहवाल देतो. मास्क वापरणाऱ्या व्यक्तीच्या श्वासात कोरोना विषाणू आहे की नाही ते शोधण्याची क्षमता मास्कमध्ये आहे. हा मास्क ९० मिनिटांत चाचणीचा अहवाल देतो. एक बटण दाबताच मास्क कोरोना चाचणी सुरू करतो. या चाचणीच्या निष्कर्षाची तुलना पॉलिमर्स चेन रिऍक्शन (पीसीआर) सोबत करता येईल. कोरोना चाचण्यांमध्ये पीसीआर टेस्ट गोल्ड स्टँडर्ड समजली जाते.
कोरोना चाचणी करू शकणाऱ्या मास्कबद्दल शास्त्रज्ञांनी एक संशोधन अहवाल तयार केला आहे. त्यानुसार मास्क डिजिटल सिग्नलचा वापर करून चाचणीचा अहवाल दाखवतो. स्मार्टफोनमधील ऍपमधून तो अहवाल पाहता येतो. हा मास्क फारसा महाग नसेल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. सध्या या मास्कच्या निर्मितीसाठी उत्पादकांचा शोध सुरू आहे.
कोरोना चाचणी करणारी संपूर्ण प्रयोगशाळा आम्ही सिथेंटिक बायोलॉजी बेस्ड सेन्सरमध्ये आणली असल्याचं संशोधन अहवालाचे लेखक पीटर नगुयेन यांनी म्हटलं आहे. 'सिंथेटिक बेस्ड सेन्सर कोणत्याही मास्कमध्ये काम करतं. या मास्कच्या माध्यमातून होणाऱ्या चाचणीची अचूकता पीसीआर टेस्टइतकी आहे. त्यासाठी येणारा खर्च अँटिजेन टेस्टइतका आहे,' असं पीटर यांनी संशोधन अहवालात नमूद केलं आहे.