मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरात मास्कचा वापर होत आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जगभरातील अब्जावधी लोक मास्कचा वापर करतात. कोरोनाचे नवे व्हेरिएंट येत असल्यानं पुढील काही महिने तरी मास्क आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असणार आहे. बाजारात विविध स्टाईलचे, डिझाईनचे मास्क दिसू लागले आहेत. आता शास्त्रज्ञांनी एक भन्नाट मास्क तयार केला आहे.
कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्यानं चिंता वाढली आहे. देशातील ८ राज्यांमध्ये ओमायक्रॉन शिरकाव झाला असून रुग्णसंख्या ४० च्या पुढे गेली आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिन्स्टन्सिंग ठेवणं अतिशय गरजेचं आहे. विविध अभ्यासांमधून मास्कच्या वापराचं महत्त्व अधोरेखित झालं असताना आता शास्त्रज्ञांनी एक नवा मास्क तयार केला आहे.
जपानमधील शास्त्रज्ञांनी एका अनोख्या मास्कची निर्मिती केली आहे. कोरोना विषाणूच्या संपर्कात येताच चमकणाऱ्या मास्कची निर्मिती शास्त्रज्ञांकडून करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात हे संशोधन महत्त्वाचं ठरेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या मास्कमध्ये ऑस्ट्रिच सेल्सचा फिल्टर लावण्यात आला आहे. त्यामुळे हा मास्क विषाणू रोखण्यात अधिक प्रभावी असेल. मास्कच्या संपर्कात विषाणू आल्यास अंधार असलेल्या ठिकाणी मास्क चमकेल.
जपानमधील क्वोटो प्रीफेक्चुरल विद्यापीठाचे अध्यक्ष यासुहिरो सुकामोटो यांनी एका संशोधकांच्या एका गटासोबत मिळून चमकणारा मास्क तयार केला आहे. या मास्कमध्ये एलईडी लाईटचा वापरदेखील करता येऊ शकतो असं सुकामोटो यांनी सांगितलं. या मास्कमध्ये ऑस्ट्रिचच्या अंड्यांपासून मिळणाऱ्या अँटिबॉडीजचा वापर करण्यात आला आहे. या पक्ष्यांना आधी कोरोनापासून बचाव करणारी इंजेक्शन्स देण्यात आली होती. बाहेरुन होणारं संक्रमण निष्प्रभ करण्याची क्षमता ऑस्ट्रिचमध्ये असते.