सोशल मीडियावर दररोज करोडो पोस्ट केल्या जातात. यामध्ये बहुतांश खोट्या दाव्यांच्या असतात तर काही खऱ्या. सोशल मीडियाच्या कंपन्यांना या पोस्ट हटविणे खूप कठीण होऊन जाते. तरीही कंपन्यांनी यासाठी काही खास टूल तयार केले आहेत, ज्यामध्ये ती पोस्ट सापडली तर ती थेट डिलीट केली जाते. कोरोना वुहान लॅबमध्ये बनल्याचे दावे पहिल्या लाटेपासून केले जात होते. मात्र, फेसबुकने यासंबंधिची पोस्ट दिसताच ती थेट डिलीट करून टाकण्याची निती अवलंबिली होती. आता फेसबुकने यामध्ये बदल केला आहे. (Facebook has made changes to its policy banning posts suggesting the Covid-19 was man-made)
कोरोना लॅबमध्ये बनविला असे सांगणाऱ्या पोस्ट आधी फेसबुक डिलीट करत होते, मात्र आता ते हटविण्यास नकार दिला आहे. द हिलने फेसबुक प्रवक्त्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या जन्माची तपासणी सुरु आहे, यामुळे तज्ज्ञांचे मत घेतल्यानंतर आम्ही अशा पोस्ट बॅन करायचे बंद केले आहे. यापुढे कोरोनाची उत्पत्ती लॅबमध्ये किंवा मानवनिर्मित असल्याचे दावे करणारी पोस्ट डिलीट केली जाणार नाहीय, असे हा प्रवक्ता म्हणाला.
आमची टीम तज्ज्ञांच्या संपर्कात आहे. त्यांच्या सल्ल्यानंतर आम्ही आमची पॉलिसी बदलली आहे, असे तो म्हणाला. याआधी कोरोना लॅबमध्ये निर्माण करण्यात आल्याचे दावे फेसबुक फेक असल्याचे मानत होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फेसबुकने म्हटले होते की, कोरोना लसीबाबतच्या अफवा फेसबुक डिलीट करणार आहे. नुकताच वुहान लॅबमध्ये कोरोनाची उत्पत्ती झाल्याचा रिपोर्ट समोर आला होता. यावर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बायडेन यांनी गुप्तचर संस्थांना लवकरात लवकर याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.