ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) कौल दिल्यानंतर दोनच दिवसात फेसबुकने भारतातून फ्री बेसिक्सचा गाशा गुंडाळला आहे. ईमेल स्टेटमेंटमध्ये भारतामध्ये प्री बेसिक आता उपलब्ध नाही असे फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
ट्रायच्या आदेशानंतर रिलायन्सने फेसबुकचा फ्री बेसिक्स प्लॅटफॉर्म पेड करण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात ट्रायच्या आदेशानुसार सगळ्या ग्राहकांना त्यांना हवी ती माहिती मिळवण्याचा व त्यासाठी समान पैसे मोजण्याचा निर्णय अमलात आला. फ्री बेसिक्समध्ये सेवा देणा-या कंपन्या त्यांना हवी असलेली माहिती ग्राहकाच्या गळ्यात मारू शकतिल अशी शंका उपस्थित होत होती. तसेच, इंटरनेट हे माध्यम सगळ्यांसाठी समान असावं त्यात भेदभाव असून नये हा विचार होता. ट्रायने हा विचार मान्य करत नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने कौल दिला आणि फेसबुकच्या फ्री बेसिक्सला छेद दिला.
भारतामध्ये फेसबुकच्या फ्री बेसिक्सची एकमेव वितरक रिलायन्स कम्युनिकेशन्स होती. त्यामुळे रिलायन्सनेच फ्री बेसिक्स पेड करण्याचा निर्णय घेतला आणि फेसबुकने भारतात फ्री बेसिक्स बंद करण्याचा निर्णय घेतला आणि भारत फ्री बेसिक्समुक्त झाला.