न्यू यॉर्क- तुम्ही फेसबुक वापरताना तुमच्या आवडीनिवडीसंदर्भातील जाहिराती किंवा माहिती वॉलवर येत असल्याचे तुम्ही पाहिले असेलच. नेमक्या आपल्या आवडीनुसार सगळ्या गोष्टी कशा वॉलवर येतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?हे सगळं होत असतं फेसबुक तुमच्यावर लक्ष ठेवून राहिल्यामुळं. फेसबुकवर असणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीकडे आपले लक्ष असते, त्याची नोंद ठेवली जाते अशी कबुलीच फेसबुकने दिली आहे.
फेसबुक लोकांच्या आयुष्यातील माहितीचा साठा परवानगीविना गोळा करत असल्याबद्दल आधीपासूनच गदारोळ माजलेला आहे मात्र त्यातच आता आपल्या प्रत्येक क्लीकवर या कंपनीचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे लोकांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण होतं हे निश्चित आहे. फेसबुकने आपण लोकांच्या ऑपरेटिंग सिस्टीम, हार्डवेअ, सॉफ्टवेअर, फोनच्या बॅटरीची पातळी, सिग्नल स्ट्रेंग्थ, त्यांच्याकडे माहिती साठवण्याची असलेली जागा, ब्लूटूथ सिग्नल, फाइल्सची नावे, त्यांचे प्रकार, ब्राउजर या सगळ्यांची माहिती ठेवत असल्याची कबुली दिली आहे. फेसबुक वापरणाऱ्या व्यक्तीचे लिंग, त्यांच्या मित्रयादीतून वगळण्यात आलेले मित्र, फेसबुक वापरणाऱ्या व्यक्तीने पाहिलेली प्रत्येक जाहिरात याचीही नोंद ही कंपनी ठेवते. फेसबूकने 222 पानांचा कागदपत्रांचा संच अमेरिकन संसदेसमोर ठेवला आहे. फेसबूक वापरत असलेल्या व्यक्तीने केलेली प्रत्येक क्लीक, त्यांच्यआजूबाजूस असणाऱ्या वस्तूंची नोंद ठेवली जाते. तसेच ऑनलाइन असो वा ऑफलाइन प्रत्येक हालचाल नोंदवण्याची व्यवस्था फेसबुकने केलेली असते, असे या कंपनीने कबूल केले आहे. फेसबुक वापरणारा माणूस आहे की रोबोट हे पाहाण्यासाठी काही नोंदी घ्याव्या लागतात मात्र फेसबूकने इतर अनेक प्रकारची, व्यक्तीच्या खासगी आयुष्यातील माहिती गोळा केल्याने या कंपनीवर टीका होत आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला अमेरिकन खासदारांच्या समितीच्या संतप्त सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती.